Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:41 IST2025-12-15T13:36:42+5:302025-12-15T13:41:34+5:30
Mumbai-Nashik Highway Traffic Update: आजपासून पुढील चार महिने मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईनाशिकमहामार्गावर माजिवडा ते वडपे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी आजपासून येत्या ९ एप्रिलपर्यंत म्हणेजच जवळपास चार महिने खारेगाव भुयारी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक आता वळवण्यात आल्यामुळे मुख्य महामार्गावरील इतर मार्गांवर ताण वाढून वाहतूक संथ होण्याची शक्यता आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे ते भिवंडी बायपास मार्गाचे रुंदीकरण वेगाने सुरू आहे आणि हे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. माजिवडा ते वडपे दरम्यान रस्ता अरुंद असल्यामुळे येथे सतत वाहतूक कोंडी होते. ही कोंडी थांबवण्यासाठी आणि प्रवासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले. सध्या मुंबई, ठाणे, भिवंडी, कळवा, कल्याण आणि नवी मुंबईच्या दिशेने लाखो वाहने या मार्गाचा वापर करतात.
वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गे कोणते?
१) मुंबई- नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्गात काही कालावधीसाठी वाहतूक बदल करण्यात आले. खारेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव भुयारी मार्गात प्रवेशबंदी राहील. या वाहनांनी टोलनाका, गॅमन रोड, पारसिक चौक मार्गे किंवा साकेत येथून खाडी पूल मार्गे पुढे जावे.
२) मुंबई- नाशिक महामार्गावरून भिवंडी किंवा ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही खारेगाव भुयारी मार्गात प्रवेशबंदी असेल. भिवंडीच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव, पारसिक चौक, गॅमन रोड मार्गे जातील. तर, ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहने कळवा खाडी पूल मार्गे पुढे जातील.