MSRTC: एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:59 IST2025-07-08T10:59:06+5:302025-07-08T10:59:53+5:30
Dombivli- Panvel Bus Service: डोंबिवली आणि पनवेल दरम्यानचा प्रवास करताना प्रवाशांच्या नाकीनऊ येत आहे.

MSRTC: एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल!
महाराष्ट्र सरकारने राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात बस सेवा पोहोचवण्याचे आश्वासन दिले असूनही डोंबिवली आणि पनवेल दरम्यानचा प्रवास करताना प्रवाशांच्या नाकीनऊ येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत दोन्ही बाजुच्या दोन-दोन फेऱ्या रद्द केल्याने कामानिमित्त सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
डोंबिवलीहून सकाळी ७.०० आणि ७.४५ वाजता एसटी महामंडळाच्या बस सुटतात. परंतु, सकाळी ९.३० ते १०.०० दरम्यान ऑफिस गाठण्यासाठी घरातून बाहेर पडणाऱ्या लोकांसाठी या दोन्ही बसेस निरर्थक ठरतात. एवढेच नाही तर दुपारपासून संध्याकाळपर्यंत डोंबिवलीला येण्यासाठी गाड्या नसतात. त्यामुळे कामगार तळोजा आणि पनवेल येथे तासनतास अडकून पडतात. एकेकाळी इंदिरा गांधी चौक हा डोंबिवलीतील महत्त्वाचा स्टॉप होता. पंरतु, हा स्टॉप बंद करण्यात आला असून ही सेवा बाजीप्रभू चौकातून सुरू होते. डोंबिवलीत कोणतेही माहिती काउंटर नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन अधिकारी म्हणतात की, एसटी महामंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा त्यांना अधिकार नाही, असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
दरम्यान, पनवेल बस डेपोचे तात्पुरते प्रभारी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी बस फेऱ्या कमी करण्यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. "कल्याण फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी पाच ते सहा तासांहून अधिक वेळ लागतो.चालक आणि वाहक थकतात", असेही ते म्हणाले.
म्हात्रेंनी पुढे सांगितले की, "अहिल्यानगरहून निघणाऱ्या बसेस वेळेवर कल्याणला पोहोचतात. परंतु, त्यानंतर कल्याण फाटा-पनवेल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते, याचा परिणाम कल्याण-पनवेल आणि डोंबिवली-पनवेल दोन्ही सेवांवर होतो. त्यामुळे आम्हाला पनवेल-रेतीबंदर मार्गावरील फेऱ्या कमी कराव्या लागल्या आहेत."
एसटी महामंडळाच्या बसमध्ये कल्याण ते पनवेल एकेरी भाडे ६५ रुपये आहे. तर, डोंबिवली ते पनवेल ६१ रुपये आहे. दुसरीकडे, तळोजा मार्गे कल्याण-पनवेल प्रवासासाठी केडीएमटी बसेस ४५ रुपये आकारतात. परंतु, केडीएमटी सेवा देखील पूर्णपणे कार्यरत नाहीत. केडीएमटीच्या फक्त काही बस तळोजा मार्गे धावत आहेत आणि त्याही दिवसभर नाहीत, असे एका प्रवाशाने सांगितले.