Carnac Bridge Reopen: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (गुरुवारी, १० जुलै २०२५) कार्नॅक उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले, ज्याला आता सिंदूर उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. दक्षिण मुंबईत पूर्व-पश्चिम वाहतूक सुधारण्यास या उड्डाणपुलाची मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. या पुलाचे काम गेल्या महिन्यात पूर्ण झाले. आज दुपारी तीन वाजल्यापासून हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती आहे.
मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ मोक्याच्या ठिकाणी असलेला सिंदूर उड्डाणपुल हा पी डी'मेलो रोडला क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी आणि मोहम्मद अली रोड सारख्या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांशी जोडतो. ऑगस्ट २०२२ मध्ये १५० वर्षे जुना कार्नॅक पूल सुरक्षेच्या कारणास्तव पाडण्यात आला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली अभियंत्यांनी हा पूल बांधला आहे. या पुलाचे काम १० जून २०२५ रोजी पूर्ण केले जाईल.
१८३९ ते १८४१ काळातील मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्या नावावरून सदर पुलाला कर्नाक ब्रीज असे नाव देण्यात आले होते. मात्र, आता या पुलाचे नाव बदलून सिंदूर फ्लायओवर ठेवण्यात आले आहे. हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित घोषित करण्यात आल्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये पाडण्यात आला होता.
या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर आहे, यातील ७० मीटर भाग रेल्वे हद्दीमध्ये आहे. हा पूल मुख्यतः दोन भक्कम स्टील गर्डरवर आधारित आहे, ज्यांचे वजन ५५० मेट्रिक टन इतका आहे. या गर्डर्सची लांबी ७० मीटर, रुंदी २६.५ मीटर आणि उंची १०.८ मीटर आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.