आधी अहमदाबादला जाणारे विमान, नंतर मुंबई विमानतळ; बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 13:56 IST2025-07-18T13:44:22+5:302025-07-18T13:56:02+5:30
Bomb Threat: मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

आधी अहमदाबादला जाणारे विमान, नंतर मुंबई विमानतळ; बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट
मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची फोनद्वारे धमकी देण्यात आली. या फोननंतर एकच खळबळ माजली. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यलयाला १४ ते १५ वेळा फोन आला. सुरुवातीला मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची फोनद्वारे माहिती देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या फोननंतर पोलिसांनी विमानतळ अधिकाऱ्यांना आणि इतर संबंधित विभागांना सतर्क राहण्यास सांगितले.
या फोननंतर पोलिसांनी तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळली नाही. त्यामुळे हा फोन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून धमक्या देण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल नंबरचा शोध घेतला जात आहे.