MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:17 IST2025-09-20T14:16:04+5:302025-09-20T14:17:20+5:30
MSRTC Recruitment: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लवकरच १७ हजारांपेक्षा पेक्षा जास्त चालक आणि सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे.

MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लवकरच १७ हजारांपेक्षा पेक्षा जास्त चालक आणि सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबवली जाणार आहे. या भरतीमुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. येत्या २ ऑक्टोबर २०२५ पासून ई-निविदा प्रक्रियेला सुरूवात होईल, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीअंतर्गत एकूण १७ हजार ४५० पदे भरली जाणार आहेत. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला दरमहा ३० हजार पगार देण्यात येणार आहे. शिवाय, उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांसोबत तीन वर्षांसाठी करार केला जाईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या भरतीचा मुख्य उद्देश एसटी महामंडळाच्या सेवेला अधिक बळकट करणे आणि प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवणे आहे. १७ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.