“८ वर्षांत सर्वांत छान भाषण, केंद्रीय बजेट चांगले पण...”; काँग्रेस खासदार नेमके काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 20:02 IST2025-02-01T20:02:33+5:302025-02-01T20:02:33+5:30
MP Vishal Patil News: सविस्तर आकडेवारी आणि माहिती आल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे काँग्रेसला समर्थन देणाऱ्या खासदारांनी म्हटले आहे.

“८ वर्षांत सर्वांत छान भाषण, केंद्रीय बजेट चांगले पण...”; काँग्रेस खासदार नेमके काय म्हणाले?
MP Vishal Patil News: निर्मला सीतारामन यांनी सांगितले की १२ लाखांपर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही. १२ लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री केले असा त्याचा अर्थ होत नाही. दोन टॅक्स रिजिम आहेत. १२ लाखापर्यंत टॅक्स नसेल तर ४ स्लॅब का केले आहेत. महागाई खूप वाढली आहे. ज्या गोष्टी ३ लाखात भागायच्या आता त्यासाठीच १२ लाख लागत आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे की, शासन आमच्या खिशातून पैसे घेत होते. आम्हाला परवडत नाही. ८ वर्षे सामान्य नागरिक बजेटकडे डोळे लावून पाहत असायचे, याची जाणीव आता निर्मला सीतारामन यांना झाली असावी. शेवटी त्यांना कळले आणि त्यांनी जाहीर केले. आतापर्यंत केलेल्या बजेटच्या ८ भाषणांपैकी सर्वांत छान भाषण झाले आहे. हे बजेट चांगले केले असले तरी ते नापास झालेले आहे. बजेट चांगले झाले आहे का, ते सविस्तर माहिती आल्यावर समजेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटील यांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सुमारे १ तास १४ मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पी भाषणामध्ये, युवा, शेतकरी, महिला, सेवाक्षेत्र, रोजगार, कर्ज आणि विशेष पॅकेज यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. एनडीएकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. सांगली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळाले नाही, ती जागा ठाकरे गटाला मिळाली. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिले. विशाल पाटील यांनी बजेटबाबत संयमित प्रतिक्रिया दिली.
एवढी ताकद देऊनही महाराष्ट्रावर एवढा राग का
महाराष्ट्राने देशाला मोठ्या प्रमाणात टॅक्स कलेक्शन दिले आहे. ३७ ते ३८ टक्के टॅक्स एकट्या महाराष्ट्राकडून देशाला जातो. अखंड देशातून एवढे टक्के टॅक्स देणारे महाराष्ट्र राज्य आहे. परंतु, बजेटमध्ये महाराष्ट्राचे नावही घेतले नाही. राज्यात सर्वांत मोठा विजय मिळाला. भाजपाला सर्वोत्तम स्ट्राइक रेट दिला. एवढी ताकद देऊनही महाराष्ट्रावर एवढा राग का, असा प्रश्न विशाल पाटील यांनी केला.
दरम्यान, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. परंतु, अशी घोषणा केलीच नाही, असे आता फडणवीस म्हणत आहेत. कर्जमुक्ती होणार की नाही, हे माहिती नाही. जुनेच कर्ज फिटले नाही, तर नवीन कर्ज मिळणारच नाही, असा दावा विशाल पाटील यांनी केला. हे सरकार फसवे आहे. गोड-गोड बोलले आहेत. सविस्तर माहिती आली की चित्र स्पष्ट होईल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.