"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:54 IST2025-07-22T13:43:08+5:302025-07-22T13:54:21+5:30

खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

MP Supriya Sule demanded the resignation of Manikrao Kokate from Chief Minister Devendra Fadnavis | "राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती

"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती

Supriya Sule On Manikrao Kokate: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात कृषीमंत्री माणिकरावर कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे आपण रमी खेळत नव्हतो या स्पष्टीकरणावर ठाम आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कोकाटेंनी राज्यालाच भिकारी म्हणून कळस गाठल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

विधिमंडळाच्या सभागृहात लक्षवेधी मांडली जात असताना माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन मी रमी खेळत नव्हतो, मला रमी खेळता येत नसल्याचे म्हटलं. तसेच यामध्ये दोषी आढळलो तर राज्यपालांकडे जाऊन माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असंही माणिकराव कोकाटे म्हणाले.

माणिकराव कोकाटेंच्या स्पष्टीकरणावर खासदार सुप्रिया सुळेंनीही एक्स पोस्ट करुन संताप व्यक्त केला. "संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

"माझ्या मोबाइलवर गेमचं पॉप अप आलं होतं जे मी स्किप करत होतो. फोन नवीन असल्यामुळे मला लगेच स्किप करता आलं नाही आणि तेवढ्यात कोणीतरी व्हिडीओ काढून व्हायरल केला. १५-१६ सेकंदांचा व्हिडीओवरुन माझ्यावर टीका सुरू केलीय. मी सभागृहात ऑनलाइन रमी खेळत नव्हतो त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणाची चौकशी करावी. त्यात मी दोषी आढळलो आणि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात निवेदन दिलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन," असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

Web Title: MP Supriya Sule demanded the resignation of Manikrao Kokate from Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.