"कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच"; संजय राऊतांनी पोस्ट केला वाल्मीक कराडचा खळबळजनक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 07:44 IST2025-01-08T07:36:44+5:302025-01-08T07:44:30+5:30
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचा एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

"कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच"; संजय राऊतांनी पोस्ट केला वाल्मीक कराडचा खळबळजनक फोटो
Beed Sarpanch Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून काही अद्याप फरार आहेत. अशातच या प्रकणात संशयित आरोपी म्हणून वाल्मीक कराडला देखील अटक करण्यात आली आहे. बीडमधील खासदार आणि आमदारांनी वाल्मीक कराडच्या दहशतीची अनेक उदाहरणे याआधी दिली होती. वाल्मीक कराडचा थेट मंत्री धनंजय मुंडे याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वाल्मीक कराडचा एक फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सगळ्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे या सगळ्यामागचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड असल्याचा आरोप देखील केला जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अशातच आता एक फोटो शेअर करून संजय राऊत यांनी मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत असल्याचे म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दिसून येत आहेत. "एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत, सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता," असं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एका फ्रेममध्ये सगळे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 7, 2025
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का?
मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत
ग्रामस्थ म्हणतायेत "सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे".
अगतिक जनता pic.twitter.com/4MSWOLi3iO
दरम्यान, भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची मागणी धस यांनी केली आहे. मात्र विनाकारण आपला राजीनामा मागितला जात असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तर धनंजय मुंडेंविरोधात चौकशीत जोपर्यंत पुरावे मिळणार नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे.