काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 21:16 IST2025-09-15T21:12:38+5:302025-09-15T21:16:21+5:30
BJP MP Ashok Chavan News: अशोक चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितले की, भाजपामध्ये येतो.

काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
BJP MP Ashok Chavan News: आज विरोधीपक्ष, यूपीएची आज काय अवस्था आहे? यूपीए नेतृत्वहीन झाली आहे. आरोप करायचे तर काय करायचे तर वोट चोरीचा आरोप सुरू झाला. भाजपाने मते चोरली असा आरोप होत आहे. मला सांगा मत चोरायची गरज पडली असती तर अर्चनाताई ७ हजार मतांनी पडल्या असत्या का? नाना पटोले अडीचशे मतांनी निवडून आले असते का?, असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी केला.
मी आयुष्यातील १४ वर्ष वनवास भोगला आहे. राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला, पण मी संपलो नाही. जनता माझ्याबरोबर होती. शंकरराव चव्हाणांची पुण्याई होती, शिवराज पाटील यांची पुण्याई आहे, त्या आशीर्वादाने मी टिकलो. १४ वर्ष वनवास भोगल्यानंतर मग मी निर्णय घेतला की आता वेळ आलेले आहे. मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना सांगितले की महाराष्ट्रातील वातावरण बदलत आहे. मी भाजपामध्ये येतो. तुमच्या आशीर्वादाने कामही करेन, असे सांगत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये येण्याची कारणे सांगितली.
भाजपाविरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे
विरोधकांकडे आता सांगायला आणि लोकांना द्यायला काहीही नाही. त्यामुळे मत चोरीचा आरोप करून भाजपाविरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शत-प्रतिशत भाजपा करण्याचे शिवधनुष्य उचलले असून, लातुरात ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत १०० टक्के होईल. विकसित महाराष्ट्राच्या धर्तीवर आता आम्हाला विकसित मराठवाडा असा संकल्प करायचा आहे. आगामी पाच वर्षांत मराठवाड्याचे चित्र बदलेल. यासाठी एकजुटीने काम करा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अशोक चव्हाण यांना आमदार, खासदार, मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी विविध महत्वाचे पदे काँग्रेस पक्षाने दिली, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी महत्त्वाची पदे मिळाली, असा ‘वनवास’ सर्वांना मिळावा अशी भावना पक्ष कार्यकर्त्यांची आहे, असा टोला सपकाळ यांनी लगावला.