मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; मराठवाडा, खान्देशात दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 06:38 AM2020-06-15T06:38:21+5:302020-06-15T06:38:37+5:30

मुंबईत घामाच्या धारा; कोकण, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सरी

monsoon covered the whole Maharashtra Heavy rain in Marathwada Khandesh | मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; मराठवाडा, खान्देशात दमदार पाऊस

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; मराठवाडा, खान्देशात दमदार पाऊस

googlenewsNext

पुणे/औरंगाबाद/जळगाव : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, त्याने सुरतपर्यंत धडक मारल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले़ दिवसभरात मराठवाड्यातील अनेक भागांत आणि खान्देशात जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तापी आणि पूर्णा नद्यांना पूर आला आहे. विदर्भात नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत पाऊस झाला. याशिवाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरसह अनेक ठिकाणी रिपरिप पाऊस झाला. मुंबईत हवामान ढगाळ असले तरी पाऊसच न झाल्याने मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या होत्या. जवळपास अर्ध्या मराठवाड्यात शनिवारी मध्यरात्री व रविवारी चांगला पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात किनवटमध्ये, हिंगोली जिल्ह्यात औंढा आणि शिरड शहापूर परिसरात, बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई आणि आष्टीत दमदार पाऊस झाला. जालना शहर आणि परभणीतही पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील इस्लापूर मंडळात रविवारी अतिवृष्टीची नोंद झाली. येथे ८३ मि़मी़ पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सरासरी २० मि.मी. पाऊस झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूरजवळील पर्यायी पूल वाहून गेला. हे पाणी तुंबल्याने आजूबाजूच्या शेतात पाणी घुसले आणि पेरणीही खरडून गेली. वसमत वगळता इतर चारही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. औंढा मंडळात ६२, तर शिरड शहापूर मंडळात ७५ मि.मी. पाऊस झाला.

मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता
सोमवारी आणि मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मराठवाड्यात जोरदार हजेरी
बीड जिल्ह्यात शनिवारी रात्री बीड, अंबाजोगाई आणि आष्टी तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली. अन्य तालुक्यांमध्ये सौम्य स्वरूपाचा पाऊस झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात ८४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. जालना शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. यात सर्वाधिक २८.२० मि.मी. पाऊस अंबडमध्ये झाला. घनसावंगी तालुक्यात २५.२९ मि.मी. पाऊस पडला.
खान्देशात जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात दमदार सरी बरसल्या. जळगावमधील अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली. हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाचे १४ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडल्याने तापी व पूर्णा नद्यांना पूर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पहाटे जोरदार सरी बरसल्या.

उपराजधानीत मान्सूनची जोरदार ‘एन्ट्री’
चक्रीवादळाच्या वाटचालीची गती मंदावल्याने चकवा देणाऱ्या पावसाने अखेर उपराजधानी नागपुरातही रविवारी दमदार ‘एन्ट्री’ केली. आज पाऊस येणार नाही म्हणून ‘लॉकडाऊन’मध्येही बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसाने रस्त्यात गाठले. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांची कसरत झाली.

एक दिवस अगोदरच महाराष्ट्र व्यापला
नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या बहुतांश भागांत झाली आहे़ मान्सूनने व्यापलेली रेषा सुरत, नंदुरबार, बैतूल, सिवनी, पेंड्रा रोड, अंबिकापूर, गया, पाटणा इथपर्यंत आहे़ निर्धारित नव्या तारखांच्या एक दिवस अगोदरच मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़ मात्र, मान्सूनच्या आगमनाला नेहमी जसा पाऊस अनुभवास येतो, तसा अनुभव अनेक ठिकाणी आलेला नाही़

Web Title: monsoon covered the whole Maharashtra Heavy rain in Marathwada Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.