मोहिते, चिखलीकर शिवसेनेत दाखल

By Admin | Updated: August 20, 2014 00:44 IST2014-08-20T00:44:12+5:302014-08-20T00:44:12+5:30

शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी आज दिवसभर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गर्दी झाली होती. तीन प्रमुख नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

Mohite, Chikhlikar filed for Shiv Sena | मोहिते, चिखलीकर शिवसेनेत दाखल

मोहिते, चिखलीकर शिवसेनेत दाखल

मुंबई : शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी आज दिवसभर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गर्दी झाली होती. तीन प्रमुख नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. 
माढा येथील राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणो आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धवलसिंह पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. ते विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 
नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधारचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. कंधारच्या नगराध्यक्ष अनुसया केंद्रे आणि जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण पाटील यांनीही त्यांच्यासोबत शिवसेनेची वाट धरली. शिवसेनेने संधी दिली तर आपण लोहा-कंधारमधून लढू, असे चिखलीकर यांनी पत्रकारांना सांगितले. 
नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत मोरे आणि राष्ट्रवादीचे नंदुरबार शहर अध्यक्ष देवेंद्र जैन यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मोरे यांची शैक्षणिक संस्था असून, त्यांच्या 91वर्षीय आजी डॉ. कमलाताई मराठे या आजही नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांच्या घराण्याचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. 
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भ्रमनिरास झाल्यानेच नेते आणि कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: Mohite, Chikhlikar filed for Shiv Sena