Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत निवृत्ती वयाबाबत एक मोठे विधान केले आहे. बुधवारी (९ जुलै २०२५) नागपूर येथील वनमती हॉलमध्ये एका कार्यक्रमा बोलताना ते म्हणाले की, ७५ वर्षांनंतर व्यक्तीने इतरांना संधी दिली पाहिजे. त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
सरसंघचालकांनी संघाचे वरिष्ठ अधिकारी मोरोपंत पिंगळे यांचे त्यांच्या जीवनावर आधारित एका इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात स्मरण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, वृंदावनमध्ये झालेल्या संघाच्या बैठकीत मोरोपंत पिंगळे यांच्या ७५ व्या वर्षाबद्दल त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन सरकार्यवाह शेषाद्री यांनी मोरोपंतांना शाल घालून सन्मानित केले. त्यावेळी मोरोपंत म्हणाले होते की, मला ७५ चा अर्थ समजतो.
मोरोपंतांची आठवत काढत भागवत म्हणाले की, ही त्यांची एक शिकवण आहे. मोरोपंत पिंगळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणत्याही प्रसिद्धीशिवाय काम करण्याची आणि पंच्याहत्तर वर्षांनी निवृत्त होण्याची शिकवण दिली होती. आणीबाणीनंतरच्या राजकीय बदलांदरम्यान आरएसएस प्रमुखांनी पिंगळे यांच्या भाकित्यांचा उल्लेख केला आणि सांगितले की, जेव्हा निवडणुकांवर चर्चा झाली, तेव्हा मोरोपंत म्हणाले होते की, जर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले, तर ते सुमारे २७६ जागा जिंकतील.
जेव्हा निकाल आले, तेव्हा २७६ जागा जिंकल्या गेल्या होत्या. निकाल जाहीर झाले, तेव्हा मोरोपंत सातारा जिल्ह्यातील सज्जनगड किल्ल्यावर सर्व माध्यमांपासून दूर होते. मोरोपंतांनी राम जन्मभूमी चळवळीतही अशोक सिंघल यांना पुढे ठेवले होते. ते स्वतः कधीही पुढे गेले नाहीत. त्यांनी त्यांच्या आचरणातून प्रसिद्धीपासून दूर राहून काम करण्याचे उदाहरण ठेवले. त्यांनी लहानपणापासूनच आत्मत्यागाची कठोर साधना केली होती. ते संघासाठी खूप समर्पित होते.