“न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता...”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:15 IST2025-01-31T16:11:57+5:302025-01-31T16:15:05+5:30
MNS Prakash Mahajan News: महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.

“न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता...”; कुणी केली टीका?
MNS Prakash Mahajan News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे बीड येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून थेट भगवानगडावर पोहोचले. श्रीक्षेत्र भगवानगड (ता. पाथर्डी) येथे धनंजय मुंडे यांनी प्रथम संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली. मुंडे यांनी शास्त्रींसोबत भोजन केले आणि तिथेच मुक्काम केला. यानंतर नामदेवशास्त्री यांनी गडाचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.
धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल भाष्य केले. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे, अशी चर्चा आहे; यावर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले की, भक्कमपणे पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावेसे वाटते की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवले नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेत आहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाही. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाही ना, असे सांगत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे.
न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले अन् आता...
धनंजय मुंडे यांना मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. मीडिया ट्रायल का केली जात आहे, त्याचा विचार धनंजय मुंडेंनी करायला हवा. बीड जिल्हा परिषदेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्रास दिला होता आणि आता तेच भांडत आहेत. स्वतः ला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले होते. न्यायाचार्य असणाऱ्या डॉ. नामदेव शास्त्रींनी न्याय देताना स्त्री-पुरुष असा भेद केला. महाराजांनी आपली प्रतिज्ञा तोडली आणि एक राजकीय भूमिका घेतली, या शब्दांत प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आणि आरोप केले.
दरम्यान, आता धनंजय मुंडे संकटात आहेत असे वाटत नाही. मीडियातून तसा भास निर्माण केला जातो आहे. नामदेव शास्त्री आणि समाज त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे, त्याबाबत कोणी बोलावे असे नाही, असे प्रकाश महाजन म्हणाले. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विरोधकांनी चांगलीच लावून धरली आहे. सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आग्रहाने केली जात आहे.