'जीव धोक्यात घालून पुण्याचे काम केलं, भाऊ म्हणून अभिमान'; बाळा नांदगावकरांकडून ओमराजेंचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 20:58 IST2025-09-24T20:54:15+5:302025-09-24T20:58:55+5:30
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकांना पुराच्या पाण्यात केलेल्या मदतीवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांचे कौतुक केले.

'जीव धोक्यात घालून पुण्याचे काम केलं, भाऊ म्हणून अभिमान'; बाळा नांदगावकरांकडून ओमराजेंचे कौतुक
Bala Nandgaonkar on Omraje Nimbalkar: मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडून काढल्याने धाराशिवसह अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. अशातच स्थानिक नेतेही मदतीसाठी पाण्यात उतरले आहे. या मदतकार्यादरम्यान ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे चांगलेच चर्चेत आले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी छातीभर पाण्यात उतरून दोन वर्षाचा नातवाला आणि आजीला वाचवलं. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही ओमराजेंचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पावसामुळे सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्याला बसला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावात नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. पुरातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांसह स्थानिक प्रशासन आणि खासदारही मदतकार्यात गुंतले आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी थेट पाण्यात उतरून बचाव कार्यात मदत केली. यावरुनच बाळा नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टमधून ओमराजेंचे कौतुक करत त्यांना राजकारणातील कोहिनूर म्हटलं.
"सध्याच्या राजकारणातील "कोहिनूर". नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खुप चांगल्या भावना नाही. या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओम राजे निंबाळकर. हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा. आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण. अनेक अमिषे, दबाव आला तरी एकनिष्ठ राहून राजकारण केले. त्यामुळेच सुमारे ३.३० लाख मतांनी निवडून आले. ओम बद्दल मी अनेकदा ऐकून असतो की तो कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे. तसेच सामान्य जनतेचा आधारवड आहे. सध्या पावसाने थैमान घातले असताना देखील केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंड वर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय पुण्याचे काम करत आहे, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.
"या सगळ्याबद्दल ओम तुझे कौतुक करण्यास शब्द कमी आहेत. नवीन पिढी ने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओम कडे बघावे आणि गलिच्छ राजकारणात ही कोहिनूर हिरा कसा असतो हे लक्षात येईल. बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओम राजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी. ओम तु लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही करत आहे ते उत्कृष्ट असेच आहे पण हे करताना तू स्वतः ची काळजी घे कारण तुझ्यावर लाखो लोक जिवापाड प्रेम करतात आणि या सर्वांसाठी तुझे असणे हे अधिक महत्वाचे आहे. राजकारणी म्हणून नव्हे तर ओम राजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खुप अभिमान आहे," असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.