'निवडणूक आयोगाने 'तुतारी' चिन्ह देऊन शुभेच्छाच दिल्या'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:16 PM2024-02-23T12:16:23+5:302024-02-23T12:35:26+5:30

चला युद्धाला उभे रहा आणि वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी असे आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

MLA Jitendra Awad has reacted after the Sharad Pawar group received the tutari symbol | 'निवडणूक आयोगाने 'तुतारी' चिन्ह देऊन शुभेच्छाच दिल्या'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?, पाहा

'निवडणूक आयोगाने 'तुतारी' चिन्ह देऊन शुभेच्छाच दिल्या'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?, पाहा

राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने काल (२२ फेब्रुवारी) हे चिन्ह पक्षाला बहाल केले. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. हि तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील 'वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी', असं म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने निशाणी दिली. एका योद्ध्याला शोभेल अशी निशाणी आहे. एक ८४ वर्षांचा म्हातारा आता युद्धासाठी उभा राहिला आहे. त्यांना म्हातारा म्हटलेलं आवडत नाही, पण मी म्हणेन, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच चला युद्धाला उभे रहा आणि वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी असे आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

तुतारी वाजलेली आहे, बिगुल फुंकलेला आहे. युद्धासाठी महाराष्ट्र तयार आहे. या महाराष्ट्र भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य शरद पवारांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र युद्ध लढण्यासाठी तयार आहे. लढेंगे और जितेंगे, पुन्हा एकदा वाजवा तुतारी गाडा गद्दारी, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी तुतरी या चिन्हावर भाष्य केलं आहे.

निवडणूक आयोगाने हे चिन्ह देऊन शुभेच्छाच दिल्या-

निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी "तुतारी" हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी 'शुभसंकेत' आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत 'तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका' असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना "तुतारी" हे चिन्ह देऊन दिला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. हि तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते. महाराष्ट्राला झुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'महाराष्ट्रद्रोही' प्रवृत्ती, तरुणांचे रोजगार शेजारच्या राज्याच्या झोळीत अलगद नेऊन टाकणारे आणि राज्याचा सामाजिक सलोखा ढळावा यासाठी सतत काम करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात संघर्ष करण्याची हाक ही तुतारी देते. मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी शेतकरी आणि महिलांचा सन्मान व महाराष्ट्राचा स्वाभिमान या त्रिसूत्रीचा अवलंब करुन  महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

कविवर्य केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे - 

'हल्ला करण्या ह्या दंभावर, ह्या बंडावर
शुरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर'
सावध ऐका पुढल्या हाका,
खांद्यास चला खांदा भिडऊनी!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष' हे नाव शरद पवार गटाला दिले होते. त्यानंतर निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे.

Web Title: MLA Jitendra Awad has reacted after the Sharad Pawar group received the tutari symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.