अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारल्यानंतर नातेवाईकांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:32 IST2018-02-24T22:32:18+5:302018-02-24T22:32:18+5:30
१५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मिठी मारून तिचा विनयभंग केला.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारल्यानंतर नातेवाईकांना मारहाण
चाकण / काळुस : भोसे ( ता.खेड ) येथील काळूस रोडवर एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी या सगळ्याचा जाब विचारायला आलेल्या मुलीच्या नातेवाईक पती-पत्नी दाम्पत्यास शिवीगाळ, दमदाटी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. या प्रकरणी दोन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार व सहाय्यक फौजदार हरगुडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी ( दि. २३ ) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भोसे ( ता.खेड ) गावचे हद्दीत काळुस रोडवर फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडली. या प्रकरणी अक्षय हनुमंत कुऱ्हाडे ( रा. भोसे, काळुस रोड, ता.खेड, जि. पुणे व त्याचा एक मित्र ( नाव, पत्ता नाही ) असा दोघांवर भादंवि कलम ३५४, ३२४, ५०४, ५०६, ३४ व बाललैंगिक अत्याचार कायदा कलम सन २०१२ चे ८, १२ नुसार आज चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसे येथील काळुस रोडवर फिर्यादीच्या राहत्या घरासमोर आरोपी अक्षय कुऱ्हाडे व त्याचा एक मित्र पल्सर दुचाकीवरून ( क्रमांक एम एच १४ एफ एन ४८८ ) फिर्यादीच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन भाचीला मिठी मारून तिचा विनयभंग केला. त्यामुळे फिर्यादी व त्यांची पत्नी यांनी त्याचा जाब विचारला असता अक्षय याने हातातील लोखंडी रोडने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करून तो मित्रासह दुचाकीवरून पळून गेला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हरगुडे पुढील तपास करीत आहेत.