"केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान"; 'त्या' विधानावर मंत्री नितेश राणे म्हणाले, "मी वस्तुस्थिती मांडली"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:08 IST2024-12-30T15:08:19+5:302024-12-30T15:08:30+5:30
पुण्यात केरळबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

"केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान"; 'त्या' विधानावर मंत्री नितेश राणे म्हणाले, "मी वस्तुस्थिती मांडली"
Nitesh Rane: मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असं विधान नितेश राणेंनी केले. त्यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, मंत्री नितेश राणे यांनी आपण वस्तुस्थितीच्या आधारावर बोललो असल्याचे म्हटलं आहे.
सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या नितेश राणे यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मस्त्य आणि बंदर खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे. प्रियांका गांधी त्यांच्यामुळे खासदार झाल्याचे वक्तव्य नितेश राणेंनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता रोष व्यक्त केला जातोय. मात्र आपण फक्त वस्तुस्थिती मांडल्याचे नितेश राणेंनी म्हटलं.
"केरळ हा आपल्या देशाचा एक भाग आहे. पण हिंदूंची कमी होत चाललेल्या लोकसंख्येची प्रत्येकाने काळजी करायला हवी. हिंदूंचे ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये धर्मांतर करणे ही तिथे रोजची गोष्ट बनली आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. मी तिथल्या परिस्थितीची तुलना पाकिस्तानातील हिंदूंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीशी करत होतो. केरळमध्येही अशीच परिस्थिती उद्भवली तर त्याचा विचार करायला हवा. आमचे हिंदु राष्ट्र हे हिंदु राष्ट्रच राहावे अशी आमची इच्छा आहे आणि हिंदूंचे सर्व प्रकारे रक्षण झाले पाहिजे. मी फक्त वस्तुस्थिती मांडत होतो जेणेकरून सर्वांना कळेल की परिस्थिती काय आहे. मी जे काही बोललो ते वस्तुस्थितीवर आधारित आहे," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रविवारी पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधीवर निशाणा साधला. "हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मला सल्ला द्यायचा आहे की तुम्ही एकटे नाही. आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत. राज्यात भगवादारी मुख्यमंत्री म्हणून तिथे आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही घाबरायची गरज नाही. हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी बेकायदेशीर वागणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. मंत्री असल्याने आता बंधन आलेत," असं नितेश राणे म्हणाले.