“संजय राऊतांची बडबड सुरू राहिली तर उरलेली शिवसेना संपेल, उद्धव ठाकरेंनी...”; भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:35 IST2025-06-03T16:35:01+5:302025-06-03T16:35:26+5:30
BJP Girish Mahajan News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

“संजय राऊतांची बडबड सुरू राहिली तर उरलेली शिवसेना संपेल, उद्धव ठाकरेंनी...”; भाजपाचा पलटवार
BJP Girish Mahajan News: बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे काय केले ते पाहा, शिवसेना संपवली. संजय राऊतांनी जे उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसवले ही दलाली पाहा. संजय राऊतांची बडबड अशीच सुरू राहिली तर उरलेली शिवसेनाही संपेल. उद्धव ठाकरे यांना विनती आहे थोडीफार राहिलेली शिवसेना वाचवा. ३५ वर्षे झाली, सात वेळा भाजपामधून निवडून आलो, आम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी माझ्या विचारांपासून दूर गेलेलो नाही. पक्ष कोणाच्या दावणीला बाधायचे काम मी करत नाही. तुम्ही शिवसेना संपवली. उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवले. गोरेगाव पत्राचाळीत काय केले हे मला बोलायला लावू नका, या शब्दांत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.
गिरीश महाजन जे बोलतात, ती भाषाच त्यांना, पक्षाला घेऊन बुडणार. पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील पहिले गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणार पहिला माणूस म्हणजे गिरीश महाजन असेल. मविआ सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू झाली, त्यावेळी ते पक्ष बदलायला तयार होते, असा मोठा दावा करतानाच, राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो, असे निरोप तेच पाठवत होते. हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत, अशी टीका राऊतांनी केली होती.
उद्धव ठाकरेंनी धारावीसाठी काही केले नाही
धारावी पुनर्वसनाची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे, नियमबाह्य काम केले जाणार नाही. जागा कमी पडत असेल तर शासन देईल. धारावी पुनर्वसनासाठी उद्धव ठाकरेंनी काही केले नाही. आता विरोधक टीका करत आहेत, असे सांगत गिरीश महाजन यांनी निशाणा साधला. तसेच २६०० सरकारी महिला यांनी जे लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे घेतले ते समोर आले हे योग्य नाही. ज्या महिला परत पैसे करतील त्यांच्यावर नाही पण ज्या महिला पैसे परत करणार नाही त्यांच्यावर काहीतरी निर्णय घेऊ शकतो, असे स्पष्ट संकेत महाजन यांनी दिले.
दरम्यान, शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आत्तापर्यंत अनेकजण या पक्षात आले, बाहेर पडले. त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. अमित शाह यांनीही शिवसेना संपवण्यासाठी जंग पछाडले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा तुम्ही आज वापरत आहात, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही राजकारणात कोण होतात? तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. नाचेगिरी करणे म्हणजे राजकारण नाही, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.