बीड प्रकरण भोवलं, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा?, फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 10:27 IST2025-03-02T10:24:38+5:302025-03-02T10:27:29+5:30
आमदारकीही रद्द व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे. पुढील काही दिवसांत त्यांची आमदारकीही रद्द होईल अशी न्यूज महाराष्ट्राला मिळेल असा दावाही करूणा मुंडे यांनी केला.

बीड प्रकरण भोवलं, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा?, फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण
मुंबई - बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात चांगलंच पेटलंय. या गुन्ह्यात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मीक कराड मास्टरमाईंड असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. वाल्मीक कराडसोबत इतर दोघांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. त्यात करूणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करून मोठा दावा केला आहे.
मंत्री धनंजय मुंडे हे उद्या ३ मार्च रोजी राजीनामा देतील अशी पोस्ट करूणा मुंडे यांनी केली आहे. याबाबत माध्यमाशी करूणा मुंडे यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे. २ दिवसांआधीच हा राजीनामा अजितदादांनी घेतला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचं अजित पवार स्वत: जाहीर करतील. मला ही माहिती मिळाली असून १०० टक्के उद्या अधिवेशनापूर्वी ते जाहीर करणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच वाल्मीक कराड माझा निकटवर्तीय आहे असं धनंजय मुंडे यांनी स्वत: सांगितले होते. जर तो दोषी असेल तर मी राजीनामा देईन असं त्यांनीच म्हटलं होते. आता धनंजय मुंडेंसमोर पर्याय नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा २ दिवसांपूर्वी घेतलाय अशी मला माहिती आहे. मोठमोठ्या नेत्यांनी आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता, अजित पवारही हे बोललेत. मी २७ वर्षापासून ओळखते. ते कुणाला मारू शकत नाहीत. मात्र त्यांच्या पदाचा गैरवापर करून बाकीचे लोक हे कृत्य करतात असंही करूणा मुंडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षातील असतील, सत्तेतील असतील किंवा त्यांच्या पक्षातील जे आमदार आहेत सगळे धनंजय मुंडे सत्तेत नको सांगतायेत. माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे. आमदारकीही रद्द व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे. पुढील काही दिवसांत त्यांची आमदारकीही रद्द होईल अशी न्यूज महाराष्ट्राला मिळेल असा दावाही करूणा मुंडे यांनी केला.
वाल्मीक कराडच ‘मास्टरमाइंड’
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे ‘सीआयडी’ने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. देशमुख हत्येसह इतर गुन्ह्यांचे १ हजार पानांचे दोषारोपपत्र ‘सीआयडी’ने गुरुवारी बीडच्या मकोका न्यायालयात दाखल केले. दोषारोपपत्रात वाल्मीक हा आरोपी क्रमांक एक आहे. या घटनेत वाल्मीक कराडसह ८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.