हिमंत असेल तर लोकसभा-विधानसभा एकत्र घेऊन दाखवा; सत्तारांचे भाजपला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 17:05 IST2020-02-18T17:02:44+5:302020-02-18T17:05:05+5:30
स्वता: काचेच्या घरात राहून लोकांच्या घराला दगड मारण्याची भाजपची सवय काही नवीन नाही.

हिमंत असेल तर लोकसभा-विधानसभा एकत्र घेऊन दाखवा; सत्तारांचे भाजपला आव्हान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळत आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागतील अशी शक्यता भाजप नेत्यांकडून सतत वर्तवण्यात येत आहे. यावरूनच शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हिमंत असेल तर भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेऊन दाखवावे, असे सत्तार म्हणाले आहे.
सत्तार म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, शिवसेनेने अभद्र आघाडी केली. मात्र भाजपने जम्मू काश्मीरमध्ये जी आघाडी केली होती, ती अधिकृत होती का ?, कर्नाटक आणि बिहारमध्ये यांनी जो खेळ खेळला तो सुद्धा अधिकृत होता का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच रात्रीचे 12 वाजता अजित पवार यांना घेऊन ते कोणती युती करणार होते. त्यामुळे स्वता: काचेच्या घरात राहून लोकांच्या घराला दगड मारण्याची भाजपची सवय काही नवीन नाही. भाजपला राजकरणाचा एवढाच आत्मविश्वास असेल तर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेऊन दाखवावे, असे आव्हान सत्तार यांनी भाजपला केले आहे.