आज मराठी भाषा दिनानिमित्त आम्ही तुम्हाला कुसुमाग्रजांच्या काही खास कविता वाचनासाठी घेऊन आलो आहोत. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

१)माझ्या मराठी मातीचा,

लावा ललाटास टिळा,

हिच्या संगाने जागल्या,

दरयाखोर्यांतील शिळा.

हिच्या कुशीत जन्मले,

काळे कणखर हात,

ज्यांच्या दुर्दम धीराने,

केली मृत्यूवरी मात.

नाही पसरला कर,

कधी मागायास दान,

स्वर्णसिंहासनापुढे,

कधी लवली ना मान.

हिच्या गगनात घुमे,

आद्य स्वातंत्र्याची द्वाही,

हिच्या पुत्रांच्या बाहूत,

आहे समतेची ग्वाही.

माझ्या मराठी मातीचा,

लावा ललाटास टिळा,

हिच्या संगे जागतील,

मायदेशातील शिळा.

२) माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात

संतांच्या शब्दात..इतिहासाच्या पानात ..

तेव्हा हसून सारीजण म्हणलीत

आम्ही शोधलं आमचं मराठीपण …

या भूमीवरील माणसांच्या मनात..

त्यांच्या जखमात ..त्यांच्या रक्तात..

त्यातून उसवतात सूर्याची किरणे….

मराठीपण ओलांडून

साऱ्या आकाशाला गवसणी घालणारे…

३) माझ्या मातीचे गायन

तुझ्या आकाश श्रुतींनी

जरा कानोसा देऊन

कधी ऐकशील का रे?

माझी धुळीतील चित्रे

तुझ्या प्रकाश नेत्रांनी

जरा पापणी खोलून

कधी पाहशील का रे?

माझ्या जहाजाचे पंख

मध्यरात्रीत माखले

तुझ्या किनाऱ्यास दिवा

कधी लावशील का रे?

माझा रांगडा अंधार

मेघामेघांत साचला

तुझ्या उषेच्या ओठांनी

कधी टिपशील का रे?

ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांनीच बजावून ठेवले आहे-

भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे

गुलाम भाषिक होऊन अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका। ( हे पण वाचा-मराठी भाषा दिन : म्हणून २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो 'मराठी भाषा दिन'?)

Web Title: Marathi Bhasha din- Selected poem of vishnu vaman shirwadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.