तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:05 IST2025-09-02T17:02:36+5:302025-09-02T17:05:48+5:30

या बैठकीत उपसमितीने केलेल्या शिफारसीनंतर अंतिम मसुदा तयार करण्यात आला. त्यानंतर हा मसुदा घेऊन स्वत: राधाकृष्ण विखे पाटील जरांगेच्या भेटीला पोहचले होते. 

Maratha Reservation: We won on your strength, Manoj Jarange Patil declaration; Read, what are the 8 demands and 8 government promises? | तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?

तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?

मुंबई - मागील ४ दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला यश येताना दिसत आहे. राज्य सरकारच्या वतीने जरांगेंच्या मागण्यांचा अंतिम मसुदा घेऊन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, उदय सामंत हे मंत्री जरांगेंच्या भेटीला पोहचले. याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर सरकारकडून काय तोडगा काढण्यात आला त्याचा मसुदा सगळ्यांसमोर वाचून दाखवण्यात आला. या मसुद्यातील मागण्यांचे जीआर निघाल्यानंतर मराठा जल्लोष करेल, गुलाल उधळूनच आम्ही इकडून जाऊ असं सांगत तुमच्या ताकदीवरच आपण जिंकलो अशी घोषणा मराठा आंदोलकांसमोर मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

२९ ऑगस्टपासून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होते. तेव्हापासून राज्य सरकारच्या नेमलेल्या उपसमितीची बैठक वारंवार सुरू होती. या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता, न्या. शिंदे समितीचे अध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य हजर होते. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर विचार करण्यात आला. यानंतर उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत उपसमितीने केलेल्या शिफारसीनंतर अंतिम मसुदा तयार करण्यात आला. त्यानंतर हा मसुदा घेऊन स्वत: राधाकृष्ण विखे पाटील जरांगेच्या भेटीला पोहचले होते. तिथे सर्व मागण्यांबाबत सरकारकडून उचललेली पावले लोकांसमोर वाचून दाखवण्यात आली. 

मागणी १ - हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी

तोडगा - हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी उपसमिती प्रस्तावित शासन निर्णयास मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील, कुळातील, नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास कार्यवाही प्रस्तावित आहे. 

मागणी २ - सातारा संस्थान गॅझेट, औंध गॅझेटची अंमलबजावणी करावी

तोडगा - सातारा संस्थान, औंध गॅझेटबाबत कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय करण्यात येईल. या विषयात काही किचकट कायदेशीर त्रुटी आहेत. त्यामुळे पुढील १५ दिवसांत अंमलबजावणीबाबत निर्णय घेऊ. यावर जरांगे यांनी १ महिन्याची मुदत दिली. 

मागणी ३ - मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत

तोडगा - मराठा आंदोलकांवरील विविध ठिकाणचे गुन्हे मागे घेतले आहेत. काही गुन्हे मागे घेण्यासाठी कोर्टात जाऊ. सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील. 

मागणी ४  - मराठा आंदोलनात बलिदान गेलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी

तोडगा - मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना आतापर्यंत १५ कोटी रुपये मदत शासनाकडून दिली आहे. उर्वरित कुटुंबाला आर्थिक मदत १ आठवड्याच्या आत त्यांच्या खात्यावर जमा होईल. राज्य परिवहन मंडळात नोकरी दिली जाईल. मात्र शैक्षणिक पात्रता पाहून एमआयडीसी, महावितरण आणि राज्य महामंडळात नोकरी द्यावी असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. त्यावर शासनाने होकार दिला. 

मागणी ५ - ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीला लावा ही मागणी होती, जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावीत. 

तोडगा - उपसमितीला न्यायिक अधिकार दिलेत. याबाबत दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जेवढे अर्ज आलेत, ते निकाली काढू. जात पडताळणी समितीकडे दाखले प्रलंबित राहणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. ग्रामपंचायतीत या नोंदी लावल्या जातील. 

मागणी ६ - शिंदे समितीला कार्यालय द्यावे, वंशावळ समिती गठीत करावी

तोडगा - शिंदे समितीला तालुकास्तरावर कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. वंशावळ समिती गठीत करण्यात येईल.  

मागणी ७ - मोडी लिपी, फारसी लिपीचे अभ्यासक घेऊन नोंदी शोधण्याचं काम करा

तोडगा - अभ्यासक दिल्यास शासकीय मानधनावर आम्ही तात्काळ ते काम करू. मात्र मानधन दिले नाही तरी चालेल आम्हाला नोंदी शोधण्याचा अधिकार द्या, पैसे नको, कुठल्याही राज्यातील, जिल्ह्यात जाऊन नोंदी शोधू. 

मागणी ८ - मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढा

तोडगा - सदर प्रक्रिया किचकट असल्याने आम्हाला १ महिन्याची मुदत द्या असं सरकारने सांगितले. मात्र २ महिने घ्या परंतु जीआर काढा असं जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिला. सगेसोयरेबाबत ८ लाख हरकती आल्या आहेत. त्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे मराठा-कुणबी एकच हा जीआर काढण्यासाठी २ महिन्याची मुदत सरकारला देण्यात आली आहे. 

Web Title: Maratha Reservation: We won on your strength, Manoj Jarange Patil declaration; Read, what are the 8 demands and 8 government promises?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.