मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत जोरदार राडा, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 03:05 PM2024-07-10T15:05:56+5:302024-07-10T15:07:04+5:30

Vidhan Parishad : सत्ताधारी आणि विरोधक वेलमध्ये जमा झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

maratha reservation obc reservation at vidhan sabha and vidhan parishad adhiveshan maharashtra neelam gorhe | मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत जोरदार राडा, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब

मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत जोरदार राडा, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब

मुंबई : मंगळवारी मुंबईत मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) चर्चा करण्यासाठी सरकाने सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली होती. यावरून आज सभागृहात कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विधान परिषदेत जोरदार राडा झाला. 

भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. पण, या बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहाणे गरजेचे होते. पण ते आले नाहीत असा मुद्दा प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. त्यानंतर विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला.

सत्ताधारी आणि विरोधक वेलमध्ये जमा झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत होत्या. पण गदारोळ कमी झाला नाही.  या गदारोळात चर्चा कशी करणार असे त्या म्हणत होत्या. आधी शांत व्हा मग बोलण्याची परवानगी देते पण कोणीही ऐकण्याचे तयारीत नव्हते. शेवटी मार्शलला बोलवा असे आदेशही निलम गोऱ्हे यांनी दिले. पण, गदारोळ थांबला नाही. शेवटी सभापती निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. 

दुसरीकडे, विधानसभेतही मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनीच सभागृहात विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. तसेच, भाजपचे आमदार अमित साटम आणि आशिष शेलार यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना धारेवर धरले. 

विधान परिषदेत काय म्हणाले प्रविण दरेकर? 
मराठा आरक्षणावरून राज्यात जातीय तेढ निर्माण होत आहे. यावर काही तरी तोडगा निघाला पाहीजे अशी मागणी होत होती. त्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सरकारने एक सर्व पक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी केली. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यानुसार सह्याद्री अतिथी गृहात सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. पण या बैठकीकडे राज्याचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली. त्यमुळे त्यांचे आरक्षणा बाबतचे पुतना मावशीचे प्रेम सर्वांना दिसून आले. ते सर्व जण एक्सपोज झाले असा हल्लाबोल प्रविण दरेकर यांनी केला.
 

Web Title: maratha reservation obc reservation at vidhan sabha and vidhan parishad adhiveshan maharashtra neelam gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.