Maratha Reservation: Nanded commits suicide, Maratha agitation continues | Maratha Reservation: नांदेडला युवकाची आत्महत्या, मराठा आंदोलन सुरूच
Maratha Reservation: नांदेडला युवकाची आत्महत्या, मराठा आंदोलन सुरूच

नांदेड/पुणे/औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (३८) याने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या निषेधार्थ भोकरफाटा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला़
माहिती मिळताच तहसीलदार डॉ़अरविंद नरसीकर, पोलीस तसेच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़ कचरू हा सुशिक्षित होता. तो हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करायचा़ त्याच्या पश्चात तीन मुली, पत्नी व वयोवृद्ध आई असा परिवार आहे. काकासाहेब शिंदे यांच्या धर्तीवर कुटुंबीयांस मदत मिळवून देण्यास शासनाकडे पाठपुरावा करू, मुलीच्या शिक्षणासाठी व वसतिगृह सोयीसाठी मदत करू, आईस दरमहा निराधार योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येईल व पत्नीस शासकीय सेवेत नोकरी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिले.
मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको, धरणे आणि अर्धजलसमाधी आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्राप्त संदेशपत्र घेऊन राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर परळीत आले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांना संदेशपत्र देत तसेच त्याचे वाचन करून आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. राज्य पातळीवरील समन्वयकांशी चर्चा करुन निर्णय कळविला जाईल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
मराठा क्रांती मोचातर्फे रविवारी पुणे जिल्ह्यात चिंचवडगावात झालेल्या श्रद्धांजली सभेवेळी टोळक्याने वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक केली. फुगेवाडी परिसरात पीएमपी बसवर दगडफेक झाली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिंचवड आणि देहूरोड पोलीस स्टेशनने परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मराठा मोर्चाने रविवारी पुण्यातही पुन्हा एकदा ‘एल्गार’ केला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ््याला अभिवादन करुन, जिजाऊवंदनेने मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
राजू शेट्टींना विरोध
हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनस्थळी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी भेट दिली. मात्र, आंदोलकांनी त्यांच्यासमोर शंखध्वनी करीत प्रथम आपल्या पदाचा राजीनामा द्या व मगच बोलावे, अशा भावना व्यक्त केल्या. आंदोलकांनी ‘चले जाव, चले जाव, राजू शेट्टी चले जाव’ या घोषणा दिल्या.

Web Title: Maratha Reservation: Nanded commits suicide, Maratha agitation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.