जास्त मुलांमुळे जमिनीचे तुकडे अन् मग आपण अत्यल्पभूधारक; अजितदादांचा कुटुंब नियोजनाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 15:13 IST2023-10-23T15:12:23+5:302023-10-23T15:13:00+5:30
Ajit pawar Speech: मी ही मराठा. आमच्या मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही. पण, मराठा आरक्षणाची एका वर्गाला गरज आहे! - अजित पवार

जास्त मुलांमुळे जमिनीचे तुकडे अन् मग आपण अत्यल्पभूधारक; अजितदादांचा कुटुंब नियोजनाचा सल्ला
५२ टक्क्यांच्या आतच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आज माढ्यामध्ये सांगितले. याचबरोबर पवारांनी कुटुंब नियोजनावरून जोरदार टोलेबाजी केली आहे. मराठा आरक्षणाची गेल्या 63 वर्षांत कधी मागणी झाली नव्हती. विलासराव देशमुख असताना आरक्षणाच्या मागणीने डोके वर काढले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आरक्षण द्यायचा निर्णय झाला. आम्हाला जो सल्ला देण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आरक्षण दिलेही. पण ते कोर्टात टिकले नाही. नंतर फडणवीस यांचे सरकार आले. त्यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले, पण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असे अजित पवार म्हणाले.
मी देखील मराठा समाजाचा आहे. दुसऱ्या समाजाचा नाही. मलाही समाजातील गरीब वर्गाला आरक्षण मिळावे असे वाटते. आमच्या मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही. पण समाजातील एका वर्गाला आरक्षणाची गरज आहे. कुणबी प्रमाणपत्र द्या, असे जरांगे पाटलांची मागणी आहे. ओबीसीत 350 जाती आहेत, त्यात कुणबीदेखील आहेत. विदर्भात देशमुखांना आरक्षण आहे. निजामशाहीतील काळातील रेकॉर्ड तपासायला सांगितले आहे. तोही प्रयत्न सुरू आहे, असे पवार म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्द्याला अजित पवारांनी वाढत्या लोकसंख्येशी जोडले आहे. जसजशा पिढ्या वाढत जातात तसे शेतीचे तुकडे पडत जातात. त्यामुळे शेतकरी अल्पभूधारक होतो. कोणी थांबायलाच तयार नाहीय. स्वातंत्र्यावेळी आपण ३५ कोटी होतो, आता १४० कोटी झालोय. चौपटीने लोकसंख्या वाढलीय. आता आपण एक दोन अपत्यांवरच थांबायला हवेय. देवाची कृपा.. देवाची कृपा… काही देवाची कृपा नसते. आपलीच कृपा असते, कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. यामुळे सर्व समाजांनी दोन मुलांवर थांबायला हवेय, असे मत अजित पवार यांनी मांडले.
आता दिलेल्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण द्यायचे आहे. नाही तर 52 टक्के समाज बिथरेल. समजून घेण्याची मानसिकता मराठा तरुण-तरुणींमध्ये राहिली नाहीय. कुणालाही नाऊमेद करण्याचा आमचा प्रयत्न नाही. आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 टक्के आरक्षण दिल्याने ते आता ६२ टक्क्यांवर गेले आहे, असे पवार म्हणाले.