Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 18:04 IST2025-08-31T18:02:58+5:302025-08-31T18:04:37+5:30
Maratha Reservation Manoj Jarange: मनोज जरांगे यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली.

Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
Manoj Jarange Latest News: सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणापत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या मागण्यांबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. मागण्यांवर निर्णय घेताना आणि घेतल्यानंतर कायदेशीर पेच निर्माण होऊन नये म्हणून राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेण्याचे ठरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्य सरकारने मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत. मनोज जरांगेंचे आझाद मैदानात उपोषण सुरू असतानाच रविवारी (३१ ऑगस्ट) या समितीची बैठक पार पडली.
बैठकीत काय चर्चा झाली? राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली माहिती
बैठकीतनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, "महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावावर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली."
"मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, तसेच अंमलबजावणीच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला", अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
उपसमितीच्या या बैठकीला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री गिरीष महाजन, कॅबिनेट मंत्री दादा भुसे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह इतर काही उपस्थित होते. काही मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.