“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 18:16 IST2025-09-14T18:14:32+5:302025-09-14T18:16:10+5:30
Manoj Jarange Patil News: आम्हाला आरक्षण मिळत आहे तर हे विरोध करत आहेत. यांना किती महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, यांचे किती वाईट विचार आहेत हे समोर येते, असे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले आहे.

“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
Manoj Jarange Patil News: अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचं असून दिलं नाही तो अन्याय वेगळाच. कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला? त्या परळीच्या लाभार्थी गँगने सर्व वंजारी, ओबीसी बदनाम केले. त्या गँगला आता बोलता येईना म्हणून दुसरे नेते बोलावून घेतले आणि इकडे जातीवाद पेटवून दिला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. सरकार म्हणून कुणाला नाराज करणार नाही, कुणावरही अन्याय करणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यावर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मला दुःख वाटते, आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळत आहे तर हे विरोध करत आहेत. यांना किती महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, यांचे किती वाईट विचार आहेत हे समोर येते. ओबीसींना आरक्षण मिळताना आमचे लोक समाधानी असायचे. आम्ही लढून मिळवले, यांना लढावे लागले नाही, दिले पण आमच्याच लोकांनी, यांचा जीआर पण आमच्या मराठ्यांच्या नेत्यांनी दिला. आमचेच इतकी वर्षे नुकसान झाले, आमचे आरक्षण तुम्ही इतके वर्षे खात होतात, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
ज्याच्या नोंदी आहे त्यांना दिले पाहिजे
बंजारा समाज एसटीमधून आरक्षण मागत आहे, यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, ज्याच्या नोंदी आहे त्यांना दिले पाहिजे, हे मत आम्ही जाहीर केलेले आहे. कारण यांच्यासारख्या मी जातीवादी नाही. कोणाच्या लेकराचे वाटोळे आम्ही कधी होऊ देत नाही, आम्हाला विरोध कोण करते, लाभार्थी टोळीचा ऐकून, परळीची लाभार्थी टोळी. त्याचा एक डोळा चष्म्याच्या बाहेर यायला लागला आता, असे त्याच्या जवळचेच कार्यकर्ते सांगत आहे. ती अजित पवारांची टोळी, विनाकारण ते मराठ्यांच्या आणि धनगरांचे भांडण लावायला लागले, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
दरम्यान, मराठ्यांच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली. या टोळीच्या माध्यमातून धनगर हाताशी धरायचे. गरीब धनगरांना आणि बीडच्या धनगर, मराठ्यांना माहित आहे की लाभार्थी टोळी फक्त यांचा वापर करते. या लाभार्थी टोळीने धनगरांना हातपाय मोडेपर्यंत मारलेला आहे. इथून पुढे जशाला तसे होणार. तुम्ही आया बहिणीपर्यंत जाणार असाल तर याद राखा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.