“कुणी आड येऊ नये, मॅनेज होण्यासाठी मराठा आंदोलन सुरू केले नाही”: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 10:33 PM2023-12-10T22:33:59+5:302023-12-10T22:34:05+5:30

Manoj Jarange Patil: तुम्हाला आरक्षण मिळाले. आम्ही विरोध केला नाही. आता आम्हाला विरोध करू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

manoj jarange patil criticised again ncp ajit pawar group leader chhagan bhujbal | “कुणी आड येऊ नये, मॅनेज होण्यासाठी मराठा आंदोलन सुरू केले नाही”: मनोज जरांगे पाटील

“कुणी आड येऊ नये, मॅनेज होण्यासाठी मराठा आंदोलन सुरू केले नाही”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: मराठा पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. मराठे पुन्हा मागे हटत नाही. अख्खा देश मराठ्यांचे आंदोलन बघत आहे. काही जण घरात बसून मराठ्यांची एकी बघतात. आपले बघून बऱ्याचशा जातींचे लोक एकत्र येत आहेत. तुम्हाला आरक्षण मिळाले. आम्ही विरोध केला नाही. आता आम्हाला विरोध करू नका. काय करायचे हे तुम्हीच ठरवा. मराठा समाजाच्या आड कुणी येऊ नये. मॅनेज होण्यासाठी आंदोलन सुरू केलेले नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मनोज जरांगे पाटील राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत असून, विविध सभांमधून मराठा समाजाला संबोधित करत आहेत. आधी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या मनोज जरांगे यांनी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने मोर्चा वळवला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला भाजप नेते मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर देत आहेत. 

मॅनेज होण्यासाठी मराठा आंदोलन सुरू केले नाही

२४ तारखेच्या आत आरक्षण द्या. नाही तर आम्हाला काय करायचे हे आम्हाला माहिती आहे. मॅनेज होण्यासाठी हे आंदोलन सुरू केले नाही. सरकरमध्येही मला मॅनेज करायचा दम नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. आरक्षणचाी ही लढाई इतक्या टोकावर जाईल असे सरकारलाही वाटले नसेल. आपला लढा गोरगरीब लोकांनाच लढावा लागणार आहे. राजकीय नेत्यांना महत्त्व देऊ नका. ज्या समाजाला मायबाप मानले आहे, ते माझ्यावर कौतुकाची थाप नाही तर कुणावर टाकणार, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्याकडे पोटभर असलं तरीही त्यांना दुसऱ्याच खाण्याची सवय लागली आहे. आता त्यांना म्हातारपणात पचत नाही. तरीही खातच आहे. निकष पूर्ण न करता ओबीसींना आरक्षण दिलं. आम्ही निकष पूर्ण करूनही आम्हाला आरक्षण नाही. तुम्ही आरक्षणचे निकष कोणते ठरवले आहेत ते आम्हाला दाखवा. मराठ्यांना आरक्षणातून बाहेर काढले. श्रीमंत म्हणून आरक्षण मधून बाहेर काढले का? मराठ्याकडे पेट्रोल पंप आहे म्हणून आरक्षण नाही का? मग छगन भुजबळांकडे पेट्रोल पंप आहे. काढा त्यांनाही आरक्षणातून बाहेर, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

 

Web Title: manoj jarange patil criticised again ncp ajit pawar group leader chhagan bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.