मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 22:00 IST2025-10-08T21:59:44+5:302025-10-08T22:00:31+5:30
Congress Criticize Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांनी आता थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख दिल्लीचा लाल्या असा केला होता. त्यानंतर जरांगेच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्यातील ओबीसी नेते आमने-सामने आले आहेत. त्यातही गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यातच जरांगे पाटील यांनी आता थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख दिल्लीचा लाल्या असा केला होता. त्यानंतर जरांगेच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, जरांगे पाटील हे लहान वयातील बाल्या आहेत. त्यांना तसेच शब्द कळतात, असं प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे.
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं या मुद्द्यावरून आक्रमक असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे तीव्र विरोध करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देताना थेट राहुल गांधींनाच लक्ष्य केले होते. ओबीसींच्या नावाखाली विजय वडेट्टीवार यांना राजकारणात सेटल व्हायचं आहे. मराठ्यांना टार्गेट करा असं दिल्लीचा लाल्या सांगतो. त्याचे दुष्परिणाम लगेच दिसू लागले आहेत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
त्यानंतर काँग्रेसकडूनही मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर देण्यात आले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे लहान वयातील बाल्या आहेत. त्यामुळे त्यांना तसे शब्द कळतात. असा त्याचा अर्थ होतो. जशी ज्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती. त्या बुद्धीप्रमाणे ते बोलतात. बालिश बुद्धी असेल तर बाल्याला दुसरा शब्द कुठला सूचणार आहे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला.