मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:25 PM2024-01-25T12:25:12+5:302024-01-25T12:25:50+5:30

मराठ्याचं भगवं वादळ मुंबईत धडकण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.

Manoj Jarange and Commissioner of Chhatrapati Sambhajinagar in Lonavala, Maratha Reservation | मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात

मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेली मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बुधवारी पुण्यात १० तास सुरू होती. पुण्यात मनोज जरांगे पाटील यांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर सरकारीच्या हालचाली वाढल्या आहेत. मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. तसेच, गेल्या तासाभरापासून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. 

आज मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा लोणावळ्यात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड हे लोणावळ्यात दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहे. तसेच, राज्य सरकारच्यावतीने आरक्षणाच्या मागणीवर चर्चा होणार आहे. याबाबत मधुकर राजे अर्दड एका वृत्त वाहिनीला माहिती दिली. ते म्हणाले, शासनाचे आदेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरु आहे. तसेच, आजची चर्चा  सकारात्मक होईल आणि मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होईल, असा विश्वास मधुकर राजे अर्दड यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, बुधवारी मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेली मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा पुण्यात १० तास सुरू होती. नागरिकांकडून होणारे स्वागत, बघ्यांची गर्दी यामुळे पदयात्रा निघालेल्या रस्त्याला पालखी यात्रेचेच स्वरूप आले होते. प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मात्र, रस्त्याची एक बाजू मोकळी ठेवून आंदोलक व त्यांची वाहने जात असल्यामुळे शिस्तीचेही दर्शन पुणेकरांना घडले. वाघोलीवरून सकाळी ११ वाजता निघालेली ही यात्रा रात्री ९ नंतर शहरातून लोणावळ्याकडे रवाना झाली. दरम्यान, लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. या सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले.

नवी मुंबईत मार्ग बदलला
नवी मुंबईत येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा मार्ग बदलला आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार आहे. सायन - पनवेल मार्गाचा वापर न करता पनवेल बाहेरील पळस्पे फाटा मार्गे जेएनपीटी रस्त्यावरून उलवे मार्गे पामबीच मार्गावर दाखल होणार आहे. मराठा मोर्चाचा मार्ग बदलला असल्याने पनवेल , कामोठे , कंळंबोली , खारघर मधील वाहतूक कोंडी न होता  मुंबई - पुणे हायवेवरील वाहतूक सुरळीत चालणार आहे. आज हा मोर्चा पनवेलमध्ये मुक्कामी असणार आहे. तसेच या कार्यकर्त्यांसाठी पनवेल आणि रायगड जिल्ह्यातून 10 लाख भाकरी आणि चपात्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Read in English

Web Title: Manoj Jarange and Commissioner of Chhatrapati Sambhajinagar in Lonavala, Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.