माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 09:18 IST2025-07-27T09:18:41+5:302025-07-27T09:18:41+5:30

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्ध शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर शनिकृपेने कोकाटेंची साडेसाती थांबते की, राजकरणातून ‘मुक्ती’ मिळते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

manikrao kokate is facing effects sade sati of oppositions allegations will shani dev save him or give him mukti from politics | माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!

माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!

Manikrao Kokate News: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलून त्यांना त्यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि व्हिडिओप्रकरणी शिक्षा दिली जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. तथापि त्यांना मंत्रिपदावरून हटवावे की त्यांचे खाते बदलावे याबाबत अजित पवार गटात एकमत झाले नसल्याची माहिती आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळात कोणताही फेरबदल केला जाणार नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत काय तो निर्णय होईल, अन्य कोणताही बदल केला जाणार नाही, असे समजते.

माणिकराव कोकाटे यांनी शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात विधिवत पूजा करून शनिदेवाला अभिषेक केला. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी त्यांनी शनिदेवाला साकडे घातले असे म्हटले जात आहे. गेल्या काही काळापासून मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयीची वादग्रस्त वक्तव्ये आणि विधिमंडळात व्हिडीओ व्हायरलमुळे चर्चेत आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे, हे येथे उल्लेखनीय.

साडेसातीची झळ, शनिदेव तारणार?

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना सध्या विरोधकांच्या आरोपांची साडेसाती लागली आहे. शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, विधिमंडळात पत्ते खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ, शासन भिकारी असल्याच्या विधानांमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आलेले कोकाटे थेट शनिमंडळात पोहोचले! साडेसाती मुक्तपीठ असलेल्या शनिमंदिरात त्यांनी संकट टळते, या भावनेतून विधिवत पूजाअर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे सांगत त्यांच्यासमोर नवे संकट उभे केले. आता शनिकृपेने कोकाटेंची साडेसाती थांबते की राजकरणातून ‘मुक्ती’ होते हे लवकरच कळेल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, आधी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता कोकाटे यांनाही काढले तर पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल असे एक-दोन ज्येष्ठ नेत्यांना वाटते. कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर रोहित पवार व अन्य विरोधकांच्या दबावाला आपण बळी पडलो असा संदेश जाईल, असाही एक प्रवाह आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार की त्यांचे खाते बदलणार की त्यांना कायम ठेवणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन बाजू मांडणार आहेत. अजित पवार हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशीही कोकाटेंच्या विषयावर चर्चा करतील. त्यानंतर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील.

 

Web Title: manikrao kokate is facing effects sade sati of oppositions allegations will shani dev save him or give him mukti from politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.