मकरसंक्रांत अशुभ असूच शकत नाही - दा. कृ. सोमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:05 AM2019-01-14T06:05:50+5:302019-01-14T06:06:14+5:30

सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसापासून दिनमान वाढत जाते.

Makar Sankrant could not be inauspicious - da Kru Soman | मकरसंक्रांत अशुभ असूच शकत नाही - दा. कृ. सोमण

मकरसंक्रांत अशुभ असूच शकत नाही - दा. कृ. सोमण

Next

मुंबई : एखादी वाईट घटना घडली की ‘संक्रांत आली’ असे म्हणण्याची प्रथा आहे. परंतु ही प्रथा चुकीची आहे. ‘मकर संक्रांत’ म्हणजे सूर्याने धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करणे. धनू राशीतून सूर्य मकर राशीत जाणे हे वाईट कसे असू शकेल? सूर्याच्या मकर संक्रांतीपासून दिनमान वाढत जाते ही तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मकर संक्रांती अशुभ असू शकणारच नाही, असे मत पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.


या दिवशी देवीने राक्षसाला ठार मारले अशीही एक समजूत आहे. ही गोष्ट देखील वाईट कशी असू शकेल ? म्हणून मकर संक्रांती ही वाईट नाही.


सोमवार (१४ जानेवारी) रोजी रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार (१५ जानेवारी) रोजी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत आहे. मकर संक्रांतीच्या दिवसात काहीजण अफवा पसरवतात. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. मकर संक्रांत ही वाईट नसते. अशुभ नसते. त्यामुळे संक्रांतीला घाबरण्याचे काहीच कारण नाही.


उलट मकर संक्रांत आनंदाने साजरी करावी. कुणाशी मतभेद झाले असतील, कुणाशी भांडण झाले असेल, कुणाशी अबोला
धरला गेला असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी त्या व्यक्तीला तिळगूळ देऊन ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून मकर संक्रांतीच्या दिवसापासून हितसंबंध सुधारण्यासाठी प्रथम आपल्याकडूनच सुरुवात करावी.


‘इतरांना क्षमा करा आणि झाले गेले विसरून जा.’ अशी शिकवण मकर संक्रांतीचा हा गोड सण आपणा सर्वांना देत असतो, असेही भाष्य सोमण यांनी केले.

आपली पंचांगे निरयन राशीचक्रावर आधारलेली
सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसापासून दिनमान वाढत जाते. भारतात २१ डिसेंबर पासूनच दिनमान वाढू लागले. आपली पंचांगे सायन राशीचक्रावर आधारलेली नसून निरयन राशीचक्रावर आधारलेली आहेत. १४ जानेवारीला रात्री ७.५० वा. सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याने निरयन मकर राशी प्रवेश जर सूर्यास्तानंतर केला तर मकर संक्रांती पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानावा असे सांगण्यात आले आहे. २१ डिसेंबरला आपल्या इथे रात्र मोठी असते व या दिवसापासून दिनमान वाढत जाते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे सर्वत्र दिनमान व रात्रीमान समान असते. २१ जूनला आपल्या इथे दिनमान मोठे असते.

Web Title: Makar Sankrant could not be inauspicious - da Kru Soman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.