Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे आगीचे तांडव! चेडा नगरमधील इमारतीच्या पार्किंगला आग; २९ दुचाकी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 09:44 IST2026-02-15T09:43:22+5:302026-02-15T09:44:27+5:30
Dombivli Cheda Nagar Raj Apartment Fire News: डोंबिवली पूर्वेकडील चेडा नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास आगीची एक मोठी घटना घडली. रविकिरण सोसायटीमधील राज अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंगमध्ये लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले, यात २९ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे आगीचे तांडव! चेडा नगरमधील इमारतीच्या पार्किंगला आग; २९ दुचाकी जळून खाक
डोंबिवली पूर्वेकडील चेडा नगर परिसरात आज पहाटे भीषण आगीची घटना घडली. रविकिरण सोसायटीमधील राज अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंगमध्ये लागलेल्या या आगीत २९ दुचाकी जळून खाक झाल्या असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने, अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
चेडा नगरमधील जय भारत स्कूलजवळ असलेल्या राज अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे ४:१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. नागरिक गाढ झोपेत असताना ही घटना घडल्याने सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, काही वेळातच आगीचा भडका उडाला आणि धुराचे लोट थेट इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचले. धुरामुळे श्वास कोंडू लागल्याने रहिवासी घाबरून जागे झाले आणि त्यांनी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली. तसेच आगीच्या धुरामुळे श्वसनास त्रास झालेल्या पाच नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण २९ दुचाकी या आगीत पूर्णपणे जळून कोळसा झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी की अन्य काही तांत्रिक बिघाड होता, याचा तपास पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत.