Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 05:46 IST2025-11-20T05:44:37+5:302025-11-20T05:46:53+5:30
Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह ‘वर्षा’वर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले.

Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह ‘वर्षा’वर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. आपण तुमच्यासोबत आहोत, आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत, याचे स्पष्ट संकेत दिले.
भाजपकडून शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकारी आणि नेते पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिंदेसेनेकडून करण्यात आला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी असा प्रकार सुरू असल्याने शिंदेसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे.
मंगळवारच्या या नाराजीनाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले. दिल्ली भेटीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ५० मिनिटे चर्चा केली. तसेच आपली भूमिका आणि नाराजी त्यांच्यासमोर मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.
महायुतीची एकत्रित प्रतिमा कायम ठेवणार
- अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची एकी मजबूत ठेवण्याबाबत चर्चा केली. या चर्चेत आगामी ३२ जिल्हा परिषदा आणि २९ महापालिका निवडणुकांबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पवार व पटेल यांनी मुख्यमंत्र्यांसमोर महायुतीची एकत्रित प्रतिमा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
- शिंदेसेनेप्रमाणे अजित पवार गटाने भाजपतील नेत्यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केलेला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत फूट पडल्याचा संदेश विरोधकांकडे जाऊ नये, याची काळजी आम्ही घेत आहोत, अशी भूमिका अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे
सूत्रांनी सांगितले.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी युती झाली नाही तरी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊन महायुतीची सत्ता स्थापन केली जाईल, असेही पवार आणि यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आश्वस्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.