महावितरणच्या वीज खरेदी घोटाळ्याची होणार चौकशी; ऊर्जा मंत्री राऊत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 09:27 IST2022-03-25T09:27:10+5:302022-03-25T09:27:31+5:30
निवृत्त संचालकाचा भ्रष्टाचारात समावेश

महावितरणच्या वीज खरेदी घोटाळ्याची होणार चौकशी; ऊर्जा मंत्री राऊत यांची घोषणा
मुंबई : महावितरणचे निवृत्त संचालक (संचालन) दिनेश साबू यांनी ३,५०० कोटी रुपयांचा वीज खरेदी घोटाळा करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपांची त्रयस्थ अधिकाऱ्यांद्वारे चौकशी केली जाईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांना निलंबित केल्यानंतर लगेच माजी संचालक (संचलन) यांच्यावरील आरोपांची चौकशी जाहीर केल्याने ऊर्जा विभागात खळबळ माजली आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यामार्फत साबू यांच्यावरील आरोपांची मुद्देनिहाय चौकशी करण्यात येईल, असे राऊत यांनी लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात सांगितले. त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.
महावितरणचे उपसंचालक सुमित कुमार निलंबित
महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) तथा मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांच्या कार्यपद्धती आणि वर्तणुकीबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत, त्यांना निलंबित करण्याची घोषणा ऊर्जा मंत्री राऊत यांनी केली.
लक्षवेधी सूचनेवर उत्तरात त्यांनी सांगितले की, सुमित कुमार हे पूर्वी केंद्र सरकारमध्ये नोकरीला होते. ते सरळसेवेने महावितरणमध्ये उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) पदावर रुजू झाले. तक्रारींमुळे त्यांची वाशीम येथे बदली करण्यात आली होती. आता ते कोकण प्रादेशिक कार्यालयात कार्यरत आहेत.
कठोर कारवाई करण्याची विधानसभेत मागणी
शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार आणि दिनेश साबू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत लक्षवेधी मांडली होती. त्यावरील चर्चेत आमदार अमित झनक, बळवंत वानखेडे, प्रकाश सुर्वे, अशोक उईके यांनी भाग घेतला. साबू यांची चौकशी होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. साबू यांच्यावरील आरोपांची तातडीने चौकशी करून दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या सर्व सदस्यांनी केली.
आर्थिक गुन्हे शाखेला सादर करणार अहवाल
खंदारे यांचा अहवाल आल्यानंतर तो शासनाला पाठविला जाईल आणि पुढील कारवाईसाठी हा अहवाल आर्थिक गुन्हे शाखा व विशेष शाखा यांना सादर करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
साबू यांचे घोटाळे
वीज खरेदीत ३५०० कोटी रुपयांचा घोटाळा.
शेतकऱ्यांच्या वीज बिलातील घोटाळा
टोरंटो पॉवर भूखंड घोटाळा
बिल्डरांच्या अनुचित फायद्यासाठी नियमात बदल.
विजेची खरेदी दिनेश साबू यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे डॉ. राऊत यांनी मान्य केले. साबूंविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आले आहे.