अमोल कोल्हेंचं विधान अन् मविआत पेटली वादाची ठिणगी; काँग्रेस, ठाकरे गटानं सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:08 IST2025-01-10T19:07:28+5:302025-01-10T19:08:33+5:30
आमच्या आमदारांनी कधी फुटलेल्या गटासोबत जाऊन सत्तेची ऊब घ्यावी असं सांगितले नाही असा पलटवार ठाकरे गटाने राष्ट्रवादी खासदारावर केला आहे.

अमोल कोल्हेंचं विधान अन् मविआत पेटली वादाची ठिणगी; काँग्रेस, ठाकरे गटानं सुनावलं
मुंबई - विधानसभा निकालात फटका बसल्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वात पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांची मुंबईत २ दिवसीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी केलेली टीका मित्रपक्ष काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही तर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही असं विधान कोल्हे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, राज्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. त्यासोबत पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत, आता आपल्याला लढायला संधी आहे. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे. त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे असं विधान त्यांनी पक्षातील आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर केले. मात्र त्यांच्या याच विधानाने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पेटली आहे.
राज्यातील सरकार झोलझाल करून आलेले आहे. जनतेच्या दिलेल्या बहुमतातून हे सरकार आले नाही. या सरकारने ईव्हीएमच्या भरवशावर सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपापल्या परीने काम करतायेत. अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडे अधिक लक्ष द्यावे, आम्हाला सल्ला कमी द्यावा असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कोल्हेंना लगावला.
दरम्यान, महाराष्ट्रात बचेंगे तो और लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतली आहे याचा अर्थ आम्ही राहिलो नाही असं नाही. आम्ही जमिनीवरच आहोत. लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, मोडलो नाही. आमचे २० आमदार आहेत त्यातील एकाचेही म्हणणं नाही की आपण समोर फुटलेल्या गटात सहभागी व्हायचे आणि सत्तेची ऊब घ्यायची हे आमच्यात कुणी सांगत नाही. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढत राहू अशा शब्दात अमोल कोल्हे यांना खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे.