Maharashtra Weather Update: राज्यावर अवकाळीचे संकट; पुढील आठवडाभर वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 20:46 IST2026-03-26T20:43:10+5:302026-03-26T20:46:39+5:30
Unseasonal Rain in Maharashtra: राज्याच्या अनेक भागात सध्या हवामानात बदल झाला असून, पुढील आठवडाभर अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update: राज्यावर अवकाळीचे संकट; पुढील आठवडाभर वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना!
राज्याच्या अनेक भागात सध्या हवामानात बदल झाला असून, पुढील आठवडाभर अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका ३० आणि ३१ मार्च दरम्यान बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या कालावधीत खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, वेगवान वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, ३१ मार्चलाही काही भागांत पावसाचा जोर कायम राहील.
मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाचा हा लहरीपणा चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे सातत्याने लक्ष द्यावे. काढणी केलेली रब्बी पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी."
राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2026
राज्यात सध्या काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडू शकतो.
३० मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस,…
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
- कापणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावे किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे.
- बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला माल भिजणार नाही, याची दक्षता घ्यावी.