आजपासून गारपीट, वादळी पाऊस; शेतकऱ्यांची धांदल, विदर्भात हवामानात बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 06:31 IST2026-03-30T06:31:42+5:302026-03-30T06:31:59+5:30
उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल होऊ शकतो.

आजपासून गारपीट, वादळी पाऊस; शेतकऱ्यांची धांदल, विदर्भात हवामानात बदल
मुंबई : संपूर्ण राज्यात आज, ३० मार्चपासून ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. ३० मार्च रोजी प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल होऊ शकतो.
३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.