लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार आहे. त्यानुसार गुरुवारी महामुंबईत जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता कायम आहे, तर महामुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारनंतर ओसरेल. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अवकाळीच्या वातावरणामुळे, कोकण वगळता परंतु मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नाही.
पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते सहा अंशांनी घट चंद्रपूर वगळता संपूर्ण विदर्भ ४ ते ६, धाराशिव वगळता संपूर्ण मराठवाडा ३ ते ५, जळगाव ६.५, अलिबाग ५.८, डहाणू ५.२, कुलाबा ३.७, सांताक्रूझ २.४ डिग्रीने खालावले. तापमानाची स्थिती १२ मे टिकून राहील. पावसामुळे महामुंबई परिसरातही गारवा पसरल्याने दिलासा मिळाला आहे.
दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा काही प्रमाणात घटले
जळगाव ४.८वर्धा ४.५परभणी ३.९ अमरावती ३.७चंद्रपूर ३.६नागपूर ३.४ छ. संभाजीनगर ३.२