Maharashtra Vidhan Sabha Result NCP likely to join Shiv Sena led government with outside congress support | महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण...
महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण...

मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटले तरी अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. विशेष म्हणजे महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढत असताना आता नव्या समीकरणांचे संकेत मिळू लागले आहेत. युतीच्या राजकारणात मोठ्या भावाचं स्थान गमावलेली आणि मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली शिवसेना नवा घरोबा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यासाठी 1995 चा फॉर्म्युला वापरण्यात येईल. मात्र पक्ष बदललेले असतील, असं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हवाल्यानं दिलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल दिल्लीत भेट घेतली. यानंतर महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळू शकतात, असं राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल, असं राष्ट्रवादीच्या नेत्यानं म्हटलं. शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडल्यावरच याप्रकारे सत्ता स्थापन होईल, असंदेखील हा नेता पुढे म्हणाला.

'होय, आमचं पवारांशी बोलणं झालं; मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार'

शिवसेना, भाजपानं 1995 मध्ये जो फॉर्म्युला वापरला होता, त्याच फॉर्म्युल्यानुसार आम्ही प्रस्ताव दिल्याचंदेखील राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितलं. '1995 मध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, तर भाजपाकडे उपमुख्यमंत्रीपद होतं. त्याच धर्तीवर आम्ही प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री होईल,' अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्यानं प्रस्ताव उलगडून सांगितला. 

शिवसेनेकडून प्रस्तावच नाही तर पुढे कसं जाणार? शरद पवारांनी 'सस्पेन्स' वाढवला

तत्पूर्वी काल सोनिया गांधींसोबत चर्चा केल्यावर शरद पवारांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपानं शिवसेनेसोबत सरकार स्थापन करावं, असं म्हटलं होतं. भाजपा, शिवसेनेकडे बहुमत आहे. राज्यातल्या जनतेनं राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे, असं पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. मात्र तुम्ही भविष्याबद्दल बोलू शकत नाही, असं म्हणत पवारांनी काहीही घडू शकतं याचे संकेत देत सस्पेन्स वाढवला. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result NCP likely to join Shiv Sena led government with outside congress support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.