Vidhan Sabha 2019: तीन दिवसांनंतरच्या मतमोजणीवर प्रकाश आंबेडकरांना आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:49 IST2019-09-23T03:09:57+5:302019-09-23T06:49:35+5:30
निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

Vidhan Sabha 2019: तीन दिवसांनंतरच्या मतमोजणीवर प्रकाश आंबेडकरांना आक्षेप
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : एकाच दिवशी मतदान होणार आहे, याचे आम्ही स्वागत करतो; परंतु मतमोजणी तीन दिवसांनंतर होणार, यावर आमचा आक्षेप आहे. या तीन दिवसांत काहीही गडबड होऊ शकते. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करून दुसऱ्याच दिवशी मतमोजणीची मागणी करणार आहोत, अशी माहिती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, बहुजन वंचित आघाडीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना तसेच अपक्ष उमेदवारांना कोणतेही स्थान अथवा पाठिंबा नसेल. मात्र, मित्रपक्षांना आवश्यक त्याठिकाणी जागा सोडून पाठबळ दिले जाईल. राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. ती रुळावर आणण्यासाठी आम्ही योजना राबविणार आहोत. तसेच या जुमलेबाज सरकारला जनता वैतागली आहे. त्यामुळे जनतेसमोर तिसरा व चांगला पर्याय म्हणून बहुजन वंचित आघाडी पुढे आली आहे.
भाजप-सेना, काँग्रेस आघाडी यांना एकजातीय स्वरूप आले असून, तेथे वंचितांना न्याय नाही. आम्ही भाजपची बी टीम असा काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या कित्येक नेत्यांवर ४२० चे गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला भाजपची बी टीम म्हणण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी सौदा केल्याची टीका आंबेडकर यांनी केली.
बंद खोलीत चर्चा
बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमानिमित्त इचलकरंजीत आले होते. त्यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंद खोलीत सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. या चर्चेबाबत राज्यातील राजकीय स्थितीसंदर्भात औपचारिक चर्चा झाली असल्याचे आवाडे यांनी सांगितले असले तरी मैत्रीपूर्ण लढतीसाठी भेट झाल्याचे बोलले जात आहे.