अभिमानास्पद! गणपती बाप्पा पावला, प्रजासत्ताक दिन संचलनात चित्ररथांमध्ये महाराष्ट्र प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:13 IST2026-01-30T11:12:51+5:302026-01-30T11:13:44+5:30
Maharashtra Tableau First In Republic Day 2026: यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात चित्ररथ श्रेणीमध्ये महाराष्ट्राच्या 'गणेशोत्सव' चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अभिमानास्पद! गणपती बाप्पा पावला, प्रजासत्ताक दिन संचलनात चित्ररथांमध्ये महाराष्ट्र प्रथम
Maharashtra Tableau First In Republic Day 2026: भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजधानी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन केल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी आपली शस्त्रास्त्रे आणि कवायतींमधून शौर्याचे प्रदर्शन केले. तसेच विविध राज्ये आणि मंत्रालयांच्या चित्ररथांनी देशाचा संपन्न सांस्कृतिक वारसा आणि विकसित भारताचे दर्शन घडवले. यावेळी महाराष्ट्राच्यागणेशोत्सवावर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर येताच गणपती बाप्पा मोरयाचा एकच जयघोष झाला. हाच महाराष्ट्राचा चित्ररथ पहिला आला आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथ श्रेणीमध्ये महाराष्ट्राच्या 'गणेशोत्सव' चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाने आधुनिकता आणि परंपरेचा सुरेख संगम साधत सर्वांचे लक्ष वेधले होते. गणेशोत्सवाचा सण 'आत्मनिर्भरतेचे' प्रतीक म्हणून दाखवण्यात आला होता. पारंपरिक पोशाखात महिला पथकाने 'लेझीम' हे लोकनृत्य सादर केले.
महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवडले
यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार व आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता. चित्ररथावरील भव्य गणेशमूर्ती, पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांच्या उत्साहाने कर्तव्यपथ दुमदुमून गेला होता. याच प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवडले. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. केवळ राज्यांच्या श्रेणीतच नव्हे, तर इतर विभागांतही चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सेना दलातून ‘भारतीय नौदल’ तर निमलष्करी दलातून ‘दिल्ली पोलीस’ यांच्या संचलन पथकाला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवण्यात आले. केंद्रीय मंत्रालयांच्या गटामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाने बाजी मारली, तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘वंदे मातरम्’ नृत्य समूहाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.