Maharashtra Rains: पिके गेली, घरही गेले, पंचनामे करा; लवकर मदत द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:27 IST2025-09-01T13:21:03+5:302025-09-01T13:27:06+5:30

मुसळधारेने नांदेडमध्ये शेकडो संसार उघड्यावर, २ हजार नागरिकांना हलविले सुरक्षितस्थळ

Maharashtra Rains: Crops have been destroyed, houses have also been destroyed, do Panchnama; provide help quickly! | Maharashtra Rains: पिके गेली, घरही गेले, पंचनामे करा; लवकर मदत द्या!

representative Image

नांदेड: शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे १४ हून अधिक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. पाण्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्याच्या पंचनाम्याला महापालिका आणि महसूलच्या पथकांनी रविवारपासून सुरुवात केली आहे. यावेळी नागरिकांनी पंचनामे करा; पण मदतीचे भिजत घोंगडे ठेवू नका, असा टाहो कर्मचाऱ्यांपुढे फोडला. तसेच मागील नुकसानीचे पैसेच अद्याप मिळाले नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या.

तीन दिवसांपूर्वी नांदेड शहर अतिवृष्टीमुळे जलमय झाले होते. विष्णुपुरीचे ११ दरवाजे उघडून विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरीला पूर आला होता. परिणामी शहरातील पाण्याचा निचराच झाला नाही. परिणामी अनेक घरांत पाणी शिरले. घरातील सर्व साहित्य भिजले होते. २ हजारावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

रेल्वे प्रवाशांचे हाल सुरूच
छत्रपती संभाजीनगर:
हैदराबादविभागातील काही ठिकाणी रुळावर पाणी साचल्यामुळे सलग पाचव्या दिवशी, रविवारी काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला. काही रेल्वे रद्द केल्या. याचा सर्वाधिक फटका नांदेडला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना बसला.

शेतकरी गेला वाहून: शावळ (ता. अक्कलकोट) येथे ३६ युवा शेतकरी ओढ्यात वाहून गेला. २४ तास उलटून गेले तरी शोध लागला नाही.

४१ तासानंतर सापडला मृतदेह: पालम (जि. परभणी) तालुक्यातील लेंडी नदीला आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेल्या २५ वर्षीय युवकाचा मृतदेह ४१ तासानंतर घटनास्थळापासून काही अंतरावर पाण्यावर तरंगताना आढळून आला.

नुकसान झाले लाखोंचे, मदत मिळणार हजारातच
यवतमाळ :
राज्यभरात पावसाने हाहाकार उडविला आहे. यात लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, शासनाकडून मिळणारी मदत केवळ दोन हेक्टरपर्यंतच मर्यादित राहणार आहे. एनडीआरएफच्या या निकषामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढावणार आहे.

एनडीआरएफच्या सूचनेनुसार नुकसानीचा अहवाल पाठविण्याच्या सूचना आहेत. सर्वत्र हा निकष ठेवण्यात आला. त्यानुसारच नुकसानीचा अहवाल पाठविण्यात आला, अशी माहिती यवतमाळचे कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी दिली.

Web Title: Maharashtra Rains: Crops have been destroyed, houses have also been destroyed, do Panchnama; provide help quickly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.