मुंबई - मागील २ दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागात नद्यांमधील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पूराची परिस्थिती उद्भवली आहे. त्यातच राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या पातळीवर खबरदारीचे उपाय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यात ठाणे, रायगड, सातारामध्ये प्रशासनाने २० ऑगस्टलाही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी आदेश काढले आहेत. त्यात म्हटलंय की, ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून अंबरनाथ येथील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील बारवी, तानसा धरणे १०० टक्के क्षमतेने भरल्याने दरवाजे उघडलेले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २० ऑगस्टला सकाळी ३.९७ मीटर इतक्या उंचीच्या लाटा समुद्रात येणार असल्याने ठाणे जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून २० ऑगस्टला ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
तर सातारा जिल्ह्यातही पावसाचे थैमान वाढले आहे. प्रशासनाकडून जिल्ह्याला २ दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यात पाटण, जावळी, वाई, कराड, महाबळेश्वर, सातारा याठिकाणी २ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कोरेगाव, खटाव, माण आणि फलटण येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र त्याठिकाणीही पावसाची परिस्थिती पाहून सुट्टी देण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सातारा शिक्षणाधिकारी अनिस नायकवाडी यांनी दिली.
दरम्यान, रायगड जिल्ह्यामध्येही अतिवृष्टी होत असून हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शाळा महाविद्यालयांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही शाळा महाविद्यालयांना २० ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातही मिरज, वाळवा, शिराळा, पलुस तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना २० आणि २१ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
५ जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.