IMD Mumbai Maharashtra Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारी (२३ जुलै) आणि शुक्रवारी (२४ जुलै) राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसहकोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
मुंबईला ऑरेंज अलर्ट, कोकणाला रेड अलर्ट
२४ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुण्यासह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर या भागांत अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस होण्याचा शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२५ जुलैला कोकणाला अतिवृष्टीचा इशारा
कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये २५ जुलै रोजीही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. २६ जुलै रोजीही हवामान असेच राहण्याचा अंदाज आहे.