Maharashtra Politics: विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण? भाजपाच्या बड्या नेत्याचं नाव चर्चेत, शिंदे गटाकडूनही मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:45 IST2022-07-01T13:44:00+5:302022-07-01T13:45:26+5:30
Maharashtra Politics: शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा बंडखोर गट आणि भाजपा यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाकडून ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Maharashtra Politics: विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण? भाजपाच्या बड्या नेत्याचं नाव चर्चेत, शिंदे गटाकडूनही मोर्चेबांधणी
मुंबई - गेले दहा पंधरा दिवस घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काल अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्यात शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा बंडखोर गट आणि भाजपा यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी बोलावले असून, त्यात ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.
दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाकडून ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते असलेले राधाकृष्ण विखे-पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काही काळ भाजपात दाखल झाले होते. सध्या ते भाजपामधील ज्येष्ठ आणि अनुभवी आमदारांपैकी एक आहे. विधानसभेतील कामकाजाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
तर बंडखोर शिवसेना आमदारांच्या गटाकडूनही विधानसभा अध्यक्षपदासाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. बंडखोर गटाकडून सध्या या गटाची बाजू माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडणारे दीपक केसरकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला शनिवारी बहुमत सिद्ध करण्याची सूचना दिली होती. तसेच २ आणि ३ जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. मात्र आता अधिवेशनाची तारीख बदलून ती ३ आणि ४ जुलै अशी करण्यात आली आहे.