दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:08 IST2025-10-03T13:06:05+5:302025-10-03T13:08:34+5:30
Sanjay Raut On Ramdas Kadam: शिंदे गटाचे नेते रामदास कदमांच्या खळबळजनक दाव्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतने संतप्त प्रतिक्रिया दिली.

दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला, असा खळबळजनक दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण ठिणगी पडली असून नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
गुरुवारी झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी असा दावा केला की, "बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी", अशीही त्यांनी मागणी केली. रामदास कदम यांच्या या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटावर टीका केली आणि कदम यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
रामदास कदम यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले की "रामदास कदम यांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं आहे, ते आता बाहेर येतंय. बाळासाहेबांना जाऊन आता एक दशक उलटत आहे, त्यांनाही आता १०० वर्ष पूर्ण होत आहेत. अशावेळी अशी वक्तव्य करणे म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे. ही एकप्रकारची बेईमानी आहे. बाळासाहेब आजारी असताना आम्ही त्यांच्या आजारपणात शेवटपर्यंत मातोश्रीवरच होतो", असेही त्यांनी स्पष्ट केले.