"आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ, 170 आमदारांचा पाठिंबा", गिरीश महाजन यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:56 IST2022-06-30T15:55:19+5:302022-06-30T15:56:35+5:30
Girish Mahajan : भाजपला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

"आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ, 170 आमदारांचा पाठिंबा", गिरीश महाजन यांचा दावा
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री सात वाजता शपथ घेणार आहेत. दरम्यान, भाजपला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.
भाजपला महाराष्ट्रात 170 आमदारांचा पाठिंबा आहे, जो 288 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 145 बहुमतापेक्षा खूप जास्त आहे. जेव्हा आम्हाला आमचे बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाईल, तेव्हा आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ शकतो. कारण, आमच्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा आहे, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यामुळे आता भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आज रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.