नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 05:48 IST2025-12-21T05:47:57+5:302025-12-21T05:48:41+5:30
Maharashtra Nagar Parishad Election Results :नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी : सर्वपक्षीय बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; लहान शहरांमध्ये दुपारपर्यंत उधळणार गुलाल कुणाच्या पारड्यात विजयाची माळ? : महायुतीतील तीनही पक्ष बाजी मारणार की विरोधी महाविकास आघाडीला कौल मिळणार याकडे लक्ष

नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, दुपारपर्यंत विजयाचा गुलाल उधळला जाईल. पहिल्या टप्प्यात २ डिसेंबरला झालेली निवडणूक आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व १४३ सदस्यपदांसाठी शनिवारी झालेल्या मतदानात कोणाला कौल मिळाला, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात सत्ता असलेल्या पक्षांनाच कौल मिळतो हा आजवरचा बव्हंशी अनुभव बघता यावेळी महायुतीतील तीन पक्षांना तुलनेने चांगले यश मिळेल, असे मानले जात आहे. मात्र, हे तीन पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढल्याने त्याचा फायदा महाविकास आघाडीला आणि मुख्यत्वे काँग्रेसला काही ठिकाणी नक्कीच होईल, असाही अंदाज आहे.
'एक्झिट पोल'च्या अंदाजात भाजप अग्रेसर
तीन मराठी वृत्तवाहिन्यांनी नगरपरिषद निवडणुकीचा एक्झिट पोल दिला असून, त्यात भाजप हा निर्विवादपणे क्रमांक एकचा पक्ष राहील असे म्हटले आहे. दोन वृत्तवाहिन्यांनी दुसऱ्या क्रमांकावर शिंदेसेना, तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. त्यानंतर अजित पवार गटाला यश मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. अन्य एका वृत्तवाहिनीने भाजपकडे १४७ नगरपरिषदांची अध्यक्षपदे जातील, असे म्हटले असून, शिंदेसेना क्रमांक २ वर, अजित पवार गट क्रमांक ३ वर, तर काँग्रेस क्रमांक ४ वर राहील, असे म्हटले आहे. एक्झिट पोलचे हे अंदाज कितपत खरे ठरतात याची उत्सुकता असेल.
या वादांमुळे गाजली नगरपरिषद निवडणूक ?
कोकणात भाजप-शिंदेसेनेने एकमेकांचे नेते पळविल्याने दोन पक्षांमध्ये कमालीची कटूता आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, असे चित्र प्रकर्षाने दिसले. शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे विरुद्ध भाजप असा संघर्ष टोकाला गेला. मराठवाड्यात काही ठिकाणी भाजपचे आणि शिंदेसेनेचे नेते एकमेकांना भिडले.
या विषयी असेल उत्सुकता
भाजप आणि शिंदेसेना हे सत्तेतील दोन पक्ष एकमेकांविरुद्ध अनेक ठिकाणी उभे ठाकले, त्यात कोण कोणावर मात करणार?
काँग्रेसने बहुतेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढविली. हा प्रयोग कितपत यशस्वी झाला?
ठाणे, रायगडसह कोकणच्या पट्टयात वर्चस्व कोणाचे ? भाजपचे की शिंदेसेनेचे?
विदर्भातील लहान शहरांचा गड कोणाकडे? भाजपकडे की काँग्रेसकडे?
भाजप क्रमांक एकवर अपेक्षित पण दुसऱ्या स्थानी कोण? काँग्रेस की शिंदेसेना?
नेत्यांच्या सभांचा धुरळा अन् आरोपांच्या फैरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी राज्यभर सभा घेऊन वातावरण तापविले होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी सभा घेतल्या नाहीत. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने या सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.