सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...

By यदू जोशी | Updated: December 22, 2025 09:12 IST2025-12-22T09:08:19+5:302025-12-22T09:12:35+5:30

Maharashtra Nagar Parishad Election Results: भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला तरी काही ठिकाणी त्यांना फटके बसले. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी ताकद दाखविली, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुढे जाताना मागचा विचार करावाच लागणार आहे. 

Maharashtra Nagar Parishad Election Results: What is the message of the victory and defeat of six parties? Eknath Shinde has achieved the most success over BJP? See how... | सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...

सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...

- यदु जोशी,

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष बहुतेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढले. निकालानंतर स्थानिक गरजा लक्षात घेऊन इकडचे आणि तिकडचे पक्ष कदाचित एकत्रही येतील, पण महापालिका निवडणुकीच्या आधी लहान शहरांनी दिलेला हा कौल कोणाला बळ देणारा, तर कोणाला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला तरी काही ठिकाणी त्यांना फटके बसले. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी ताकद दाखविली, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुढे जाताना मागचा विचार करावाच लागणार आहे. 


सकारात्मक प्रचाराचे यश, तरी काही तडे !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला सकारात्मक प्रचार, राज्य आणि केंद्रात असलेली सत्ता, कार्यकर्त्यांचे प्रचंड मोठे नेटवर्क यामुळे नगरपरिषद निवडणुकीत भाजपला राज्यात निर्विवाद क्रमांक एकचे यश मिळाले असले तरी काही ठिकाणी तडे, तर काही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या. विजयाच्या आनंदाबरोबरच काहीशा आत्मपरीक्षणाची वेळही पक्षावर आली आहे. 
प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून फडणवीस यांनी विकासाचा सकारात्मक अजेंडा मांडला. ‘तुम्ही कमळाला मत द्या, मी पुढची पाच वर्षे तुमच्या शहराची काळजी घेतो’ या त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. फडणवीसांवर मतदारांनी विश्वास टाकत भाजपच्या पदरात मोठे यश टाकले. 
 पक्षाच्या सर्वच मोठ्या नेत्यांनी ही जणू विधानसभेची निवडणूक असल्याचे समजत प्रचारात स्वत:ला झोकून दिले. प्रचाराचे उत्तम नियोजन, समन्वय, बूथप्रमुखांपासून रोजच्या रोज आढावा बैठका, प्रदेश भाजपकडून सर्व प्रकारची मदत हीदेखील भाजपची जमेची बाजू होती. मित्रपक्ष शिंदेसेना आणि अजित पवार गट यांच्याशी युती न करताही मोठे यश मिळवता येते हे भाजपने सिद्ध केले. 

काही ठिकाणच्या निकालांनी पक्षावर आत्मपरीक्षणाची वेळ
काही ठिकाणच्या निकालांनी मात्र भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळ आणली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ११ पैकी केवळ दोन ठिकाणी मिळालेले यश धक्कादायक ठरले. २०१९ च्या लोकसभा निवडणूक निकालापासून पक्षसंघटनेची जिल्ह्यात विस्कटलेली घडी अजूनही बसू शकलेली नाही हे निकालाने दिसते. 
सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे हे बाहेरचे, त्यांच्याकडे सर्व सूत्रे दिल्याचा फटका भाजपला बसला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले इनकमिंग कितपत फलदायी ठरले यावरही आता चर्चा होईल. तसेच, हे करत असताना जुनेजाणते नेते दुखावले गेल्याने नीट मेळ बसू शकला नाही असेही आता म्हटले जात आहे. 
नंदुरबारमध्ये नगराध्यक्षपदाबाबत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. आधी हाती असलेल्या दोन नगरपरिषदाही गेल्या. अंतर्गत गटबाजीने पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 
गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठे धक्के बसले. पूर्वी हातात असलेल्या चारपैकी तीन नगरपरिषदा/पंचायत पक्षाने गमावल्या. गोंदियासह तीन ठिकाणी काँग्रेसने नगराध्यक्षपद जिंकले. भाजप व अजित पवार गट वेगळे लढले. भाजपने उमेदवार देताना केलेल्या चुका भोवल्या अशी चर्चा होत आहे.

भाजपशिवायच्या यशाने एकनाथ शिंदेंना बळ
भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आपल्या पक्षाला चांगले यश मिळवून दिले; पण नगरपरिषद निवडणुकीत बहुतांश ठिकाणी ते भाजपशिवाय स्वबळावर लढले आणि त्यांनी दमदार यश मिळाले. हे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजपबरोबर जागावाटपाची चर्चा करताना त्यांना बळ देणारे असेल.
शिंदेसेनेची लढत यावेळी विरोधकांपेक्षा मित्रपक्ष भाजप व अजित पवार गटाशीच होती. विरोधकांबरोबरच मित्रांचा पराभव करण्याचे हे आव्हान शिंदे यांनी यशस्वीपणे पेलले, असे निकालाचे आकडे सांगत आहेत. शिंदेसेनेच्या बहुतेक आमदारांनी त्यांचे गड राखल्याने यशाचा एकत्रित मोठा आकडा दिसू शकला. महायुतीमध्ये क्रमांक दोनचा पक्ष शिंदेसेनाच यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. शिंदे यांनी गेल्या आठ-दहा महिन्यांत अन्य पक्षांच्या प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षात खेचले. त्यामुळे त्यांची ताकद वाढली. 
मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांच्या काळात सामान्यांशी नाळ जोडणारा मुख्यमंत्री,  लाडकी बहीण योजनेसह ‘देणारा मुख्यमंत्री’ ही प्रतिमा या निवडणुकीतही त्यांना फायद्याची ठरली. 

अनेक ठिकाणी भाजपवर मात; विस्तारण्याची मिळाली संधी 
अनेक ठिकाणी शिंदे यांनी भाजपवर मात केली. या निमित्ताने शिंदेसेनेला विस्तारण्याची संधी मिळाली. ‘आम्ही सत्तेसोबतच निवडणुकीतही तुमचा मित्र असणे तुम्हाला अधिक सोईचे आहे’ असा संदेश शिंदे यांनी भाजपला दिला आहे. 
खरी शिवसेना कोणती? उद्धव ठाकरेंची  की एकनाथ शिंदेंची? या प्रश्नाची चर्चा नेहमीच होते. परंतु, त्याबाबत मतदारांनी शिंदेसेनेला नगरपरिषदेत कौल दिला हे स्पष्ट झाले. 

अजित पवार गट तिघांत तिसरा, पण दमदार यश

नगरपरिषद निवडणुकीत तिसरा क्रमांक मिळवत अजित पवार गटाने उल्लेखनीय यश मिळविले. उत्तम नियोजन, अजित पवार, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे या तिघांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर सोपविलेली जबाबदारी आणि आपल्या प्रभावपट्ट्यावर लक्ष केंद्रित केल्याने हे यश संपादन करता आले. 
नगराध्यक्ष पदासाठी  ‘इलेक्टिव्ह मेरिट’ हा निकष प्रामुख्याने लावण्यात आला. त्या दृष्टीने सर्वेक्षणेही केली होती. शिंदेसेनेप्रमाणे अजित पवार गटही वेगळा लढला. पण भाजपशी संघर्ष करण्याची भूमिका न घेता आपले गड सांभाळण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या टीमने भर दिला.  
अजित पवार हे वित्तमंत्रीही आहेत. त्यांनी तिजोरीच्या चाव्या आपल्या जवळ आहेत, असे म्हणत विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली, मतदारांनी त्यावर विश्वास टाकला. शरद पवार गटापेक्षा सहापट अधिक यश अजित पवार यांनी मिळवून दाखवले. आता महापालिका निवडणुकांत भाजप-शिंदेसेना युती होणार व अजित पवार गट वेगळा लढणार असे चित्र आहे. त्यादृष्टीने पक्षाला रणनीती आखावी लागणार आहे.   

धर्मनिरपेक्ष मतदारांनी दिलेली पसंती ठरली फायद्याची  
आपल्या एकट्याची ताकद टिकणार नाही हे हेरून स्थानिक लहान पक्ष, आघाड्या यांना सोबत घेण्यावर अजित पवार गटाने भर दिला. भाजप-शिंदेसेनेविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांच्या तुलनेत धर्मनिरपेक्ष मतदारांनी अजित पवार गटाला पसंती दिली. 
भाजपविरोधात मत द्यायचे पण, सत्ताधारी पक्षासोबतही राहायचे, असा पर्याय निवडणाऱ्यांनी अजित पवार गटाला पसंती दिली. त्याचाही फायदा झाला. 

उद्धवसेना तळाला, गड आणखी खचले

ज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये नगरपरिषद निवडणुकीत तळाची कामगिरी राहिली ती उद्धवसेनेची. या निकालाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अन्य नेते, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे प्रचारात उतरले, 
त्यांनी सभांचा धडाका लावला. मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे प्रचारापासून दूर राहिले. उद्धवसेनेच्या प्रचाराचे नियोजन राज्यपातळीवर एकत्रितपणे केले जात असल्याचे दिसले नाही. स्थानिक पातळीवर अधिकार दिल्याचे सांगत पक्षनेतृत्वाने हात वर केले, असे चित्र होते. 
मुंबई महापालिकेत उद्धवसेनेची ‘करो या मरो’ अशी स्थिती असल्याने या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेल्या उद्धवसेनेच्या नेतृत्वाने नगरपरिषद निवडणुकांत लक्ष घातले नाही. त्याचाही फटका बसला. पक्षाच्या काही आमदारांना त्यांच्या नगरपरिषदा राखता आल्या नाहीत.  

कोकणात उतरती कळा; मराठवाड्यातही संघर्ष 
मुंबई आणि एमएमआरमध्ये एकत्रित शिवसेनेचा प्रचंड प्रभाव अनेक वर्षांपासून होता. मात्र, एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर उरलेल्या उद्धवसेनेला कोकणात उतरती कळा लागली असल्याचे आजच्या निकालांवरून स्पष्टपणे दिसत आहे.
मराठवाड्यातही एकेकाळी दबदबा असलेल्या ठाकरेंना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून आले. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही तीच परिस्थिती दिसून येत आहे.

शरद पवार गटाची पीछेहाट; पुढील वाटचाल कशी?

गरपरिषद निवडणुकीत शरद पवार गटाची कामगिरी निराशाजनक राहिली. लोकसभेतील यश विधानसभेला टिकवता आले नाही. आता नगरपरिषदेतही पीछेहाट झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल? हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांंना निश्चितच सतावणार आहे. 
अजित पवार भाजपसोबत गेले अन् २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणते पवार मोठे हा प्रश्न समोर आला तेव्हा काकांच्या पारड्यात आठ खासदार आले, 
तर अजित पवारांना केवळ एक जागा 
मिळाली. पण विधानसभेत अजित पवारांचे ४१ आमदार निवडून गेले तर शरद पवार यांचे केवळ १०. तेव्हापासूनच पुतण्याची 
काकांवर सरशी सुरू झाली, ती नगरपरिषद निकालातही दिसली. 
नेते, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा स्वभाव, नेटवर्क ही बाब पुतण्याला काकांपेक्षा सरस ठेवण्यात साह्यभूत ठरते. वार्धक्य, पक्षाचा झालेला संकोच, नवमतदारांना आकर्षित करण्याची कमी होत चाललेली शक्ती या बाबी शरद पवार यांना उणे करतात; आजच्या निकालाने तेच सांगितले आहे.

दोन राष्ट्रवादी पुढे-मागे एकत्र येण्याचे वारंवार संकेत 
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मात्र दोन पवारांमध्ये ठाकरे-शिंदेंसारखी कटुता कधीही दिसली नाही. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात राहतात. दोन राष्ट्रवादी पुढे-मागे एकत्र येण्याचे संकेत मिळत राहतात. 
शरद पवारांचे वय लक्षात घेता पुढील काळात अजित पवार यांच्याकडेच एकत्रित राष्ट्रवादीचे नेतृत्व असेल असे मानणारा वर्ग नगरपरिषद निवडणुकीत अजित पवारांच्या मागे उभे राहिल्याचा तर्क दिला जात आहे.

मविआतील तीन पक्षांत काँग्रेसची कामगिरी सरस

धानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत तीसहून अधिक नगराध्यक्षपदे मिळाल्याने बुडत्या जहाजाला काहीसा आधार मिळाला आहे. जातीय समीकरणे व सत्तारुढ महायुतीमधील पक्षांनी वेगवेगळे लढणे ही बाब काँग्रेसच्या पथ्यावर पडली आहे. 
शरद पवार गट वा उद्धवसेना यांच्यापेक्षा काँग्रेसची स्थिती चांगली राहिली; पण भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटानंतर काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. परंपरागत मतदारांनी दिलेली साथ आणि विरोधकांमधील दुफळीचा काँग्रेसला फायदा झाला, असे त्यांनी जिंकलेल्या जागांवरून दिसत आहे. 
मुंबई पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने आधीच केली आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्रितपणे लढणार आहेत. मात्र, नगरपरिषद निवडणुकीत उद्धवसेनेची पीछेहाट आणि त्या तुलनेने काँग्रेसला मिळालेले चांगले यश यामुळे राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी लढली तर पालिकेत चांगले यश मिळू शकते, असे संकेतही नगरपरिषद निकालाने दिले आहेत. 

यशात विदर्भाचा वाटा मोठा, मात्र इतरत्र सुधारणेस वाव  
काँग्रेसला विदर्भात अपयश आले असले तरी राज्यात काँग्रेसला मिळालेल्या यशात विदर्भाचा वाटा सिंहाचा असल्याचे आकडेवारी सांगते. अन्य भागातील पराभवाचे आत्मचिंतन काँग्रेसला करावे लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पक्षाला फार मोठे यश मिळवून देऊ शकले नसले तरी महाविकास आघाडीत पक्षाची कामगिरी सर्वोत्तम ठरली, ही जमेची बाजू. 
हर्षवर्धन सपकाळ हे राज्यभर फिरत होते. अन्य बहुतेक मोठ्या नेत्यांनी आपापले जिल्हे सांभाळले. त्यातील निवडक नेत्यांना आपले गड सांभाळून ठेवता आले.  काँग्रेस संपली असे म्हणणाऱ्यांना या पक्षाचे अस्तित्व आजही आहे, हे दिसले असले तरी गतवैभवापासून काँग्रेस अजूनही कोसो दूर असल्याचेही निकाल सांगतो. 

Web Title : महाराष्ट्र स्थानीय चुनाव: भाजपा आगे, शिंदे को फायदा, अन्य को पुनर्विचार

Web Summary : महाराष्ट्र के स्थानीय चुनावों में भाजपा सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी, लेकिन कुछ क्षेत्रों में झटके लगे। एकनाथ शिंदे गुट ने स्वतंत्र रूप से ताकत दिखाई, जिससे भविष्य की बातचीत को बढ़ावा मिला। कांग्रेस ने एमवीए पार्टियों में सर्वश्रेष्ठ प्रदर्शन किया। परिणाम पवार और ठाकरे गुटों के लिए आत्मनिरीक्षण का संकेत देते हैं।

Web Title : Maharashtra Local Elections: BJP Leads, Shinde Gains, Others Need to Rethink

Web Summary : BJP emerged as the largest party in Maharashtra's local elections, but faced setbacks in some areas. Eknath Shinde's faction showed strength independently, boosting future negotiations. Congress performed best among MVA parties. Results prompt introspection for Pawar and Thackeray factions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.